जळगाव, 22 जानेवारी : देशभर लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती सुरू असताना जिल्ह्यातून राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना काँग्रेसमधून पुढील सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांनी आज जळगावात पत्रकार परिषद घेत आमचे निलंबन करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
काँग्रेस प्रदेशचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉ.वर्षा पाटील व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे या तिघांना सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार संघटन व प्रशासनाचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या स्वाक्षरीचे कारवाईचे पत्र या तिघांना पाठविण्यात आले आहे. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या डॉ. उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉ.वर्षा पाटील तसेच देवेंद्र मराठे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले डॉ. उल्हास पाटील? –
पत्रकार परिषदेत डॉ. उल्हास पाटील यांनी आमच्याशी कुठलीच चर्चा न करता आमचे निलंबन करणे चुकीचे असे म्हणत, माझी मुलगी केतकी पाटील हिला मोदींचे विचार, त्यांचे कार्य आवडते तिला भाजपात जायचे आहे. मात्र, त्यात माझे व देवेंद्र मराठे याचे निलंबन का करण्यात आले? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसमध्ये ही एकाधिकारशाही आहे. ही लोकशाही नाही. माझ्याशी कधीच चर्चा करण्यात आली नाही.
मी काँग्रेस सोडून इतर कुठल्याही पक्षात गेलेलो नाही. तरीही निलंबनाचे आदेश काढणे चुकीचे आहे. मला आता दुसरा मार्ग बघायला हवा. तो मार्ग लवकरच कळवू, असेही माजी खासदार डॉ.उल्हास पाटील म्हणाले. तसेच मला पक्षातून तुम्हाला काढता येणार नाही, असे मला प्रदेश युवा अध्यक्षांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कारवाई चुकीची आहे. त्याबाबत वरिष्ठांकडे चर्चा सुरु असल्याची माहिती देवेंद्र मराठे यांनी सांगितले.
हेही वाचा : Ayodhya Ram Mandir Sohala : हा क्षण विजयासोबत विनम्रतेचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी