पुणे, 3 ऑगस्ट : महाराष्ट्रातील प्रख्यात निसर्गकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ना. धो. महानोर यांचे संपूर्ण नाव नामदेव धोंडो महानोर असे होते. त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात आहे.
साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित –
ना. धों. महानोर यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 रोजी झाला होता. ते मराठी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक होते. सन 2000 मध्ये पानझड या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे… pic.twitter.com/SF42UsISfp
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 3, 2023
ना. धों. महानोर यांनी केलेले लिखाण –
महानोरांचा पहिला काव्यसंग्रह, रानातल्या कविता (1967). त्यानंतर वही (1970) आणि पावसाळी कविता (1982) असे आणखी दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गांधारी (कादंबरी−1972), गपसप (1972), गावातल्या गोष्टी (1981−दोन्ही लोककथासंग्रह) असे गद्यलेखनही त्यांनी केले आहे. त्यांनी केलेले लोकगीतांचे एक संकलनही (पळसरोडची गाणी, 1982) प्रसिद्ध झालेले आहे. यासोबतच काही चित्रपटांसाठीही त्यांनी गीते लिहिली आहेत.
यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील फलटण या गावी, 25 ते 27 नोव्हेंबर 2012 या दिवशी यशवंतराव चव्हाण स्मृती साहित्य संमेलन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे व फलटण शाखा आणि सातारा जिल्हा परिषद यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ना.धों. महानोर होते.
मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात 22 फेब्रुवारी 2012 रोजी झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नाही तर 24 मार्च 2014 रोजी सुरू झालेल्या दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. तसेच नंदुरबारचे पहिले जिल्हा साहित्य संमेलन, 14 जानेवारी 2009 रोजी नंदुरबार येथे झाले होते. या संमेलनाचे अध्यक्षही रानकवी ना. धों. महानोर होते.
ना. धों. महानोर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान –
- भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार, वर्ष 1991
- जागतिक चित्रपट महोत्सव गीतकार जीवन गौरव पुरस्कार, पुणे, वर्ष 2015
- कृषीभूषण (महाराष्ट्र शासन) वर्ष 1985
- ‘वनश्री’ पाणलोट पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल. वर्ष – 1991
- ‘कृषिरत्न’ शेती क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्दल सुवर्ण्पदक वर्ष – 2004
- डॉ. पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार, वर्ष – 2004
- कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, वर्ष – 2004
- साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. 2000 – ‘पानझड’
- विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (महाराष्ट्र शासन) (2012)
- ‘मराठवाडा भूषण’
- महानोर आणि त्यांच्या पत्नी सुलोचना यांना यशवंत-वेणू पुरस्कार (2017)
- अनंत भालेराव स्मृतिपुरस्कार.
- जळगाव येथील भंवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाऊंडेशन सर्वोत्कृष्ट गद्य लेखनासाठी ना.धों. महानोर पुरस्कार देते. 2016-17 वर्षासाठीचा हा पुरस्कार किरण गुरव यांना मिळाला होता. तसेच सदानंद देशमुख यांनाही निसर्गकवी ना.धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्य लेखन पुरस्कार (जळगाव) मिळाला होता.