इसा तडवी, प्रतिनिधी
सामनेर, (पाचोरा) : पाचोरा तालुक्यातील सामनेर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बैलाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याच्या मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. बैलाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. आत्माराम दंगल पाटील (वय-61) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते सामनेर येथील रहिवासी होते. काल (गुरुवारी) दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्माराम दंगल पाटील हे त्यांच्या शेतात काम करत होते. यावेळी बाजूच्या शेतातील माणिक वामन पाटील यांना घरुन बोलवणं आल्यावर ते घरी गेले. तसेच जाताना आपल्या शेतातील बैलावर लक्ष ठेवण्याचे बाजूच्या शेतातील आत्माराम दंगल पाटील यांना सांगून निघून गेले.
यानंतर दुपारच्या सुमारास माणिक वामन पाटील यांच्या शेतातील हा बैल सुटला. त्याला बांधण्यासाठी आत्माराम दंगल पाटील हे गेले असता त्यांच्यावर या बैलाने जोरदार हल्ला केला. दुर्दैवाने या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. सामनेर गावातील या दुर्दैवी घटनेनंतर सर्व गावाला मोठा धक्का बसला आहे.
गावातील ही पहिलीच घटना –
मृत शेतकऱ्याचा मृतदेह हा सामनेर येथील ग्रामस्थांनी शवविच्छेदनासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर आज त्यांच्यावर सामनेर गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेनंतर सामनेर गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गावातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा – “लासगाव बरडीवरील सोलर प्रकल्प रद्द करा!,” ग्रामस्थांची तीव्र मागणी, ग्रामपंचायत प्रशासनाला निवदेन