ईसा तडवी, प्रतिनिधी
लासगाव (पाचोरा), 18 जून : पाचोरा तालुक्यातील लासगाव गावाच्या हद्दीत येणाऱ्या बरडीच्या परिसरात सोलर प्रकल्प उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, या सोलर प्रकल्पाच्या कामाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध करत हा प्रकल्प रद्द करावा, अशी तीव्र स्वरूपाची मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
लासगावच्या बरडीवर सोलर प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. यांसंबंधीची परवानगी या सोलर प्रकल्पास मिळाली असल्याची माहिती आहे. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनी याला विरोध केला असून हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली आहे.
“ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेतली असून तहसिलदार, कार्यकारी अभियंता (महावितरण) आणि जिल्हाधिकारी यांना सदर प्रकल्पाची परवानगी रद्द करण्याबाबतचे निवदेन देण्यात येणार आहे.”
– अनिल पगारे
ग्रामसेवक, लासगाव
ग्रामस्थांनी दिले निवदेन –
बरडीवरील सोलर प्रकल्प उभारण्यास परवानगी मिळाली असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी लासगाव ग्रामपंचयतीच्या प्रशासनाशी चर्चा करत आपले म्हणणे मांडत प्रकल्प रद्द करण्यासंबंधीचे निवदेन दिले. यावेळी सरपंच समाधान पाटील, ग्रामसेवक अनिल पगारे, ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.ग्रामस्थांनी नेमकं काय म्हटले –
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले की, आपल्या गावाच्या हद्दीत येणारा बरडीचा परिसर हे आपल्या गावाचे वैभव आहे. तसेच ही आपल्या गावाची संपत्ती आहे. मात्र, असे असतानाही गेल्या काही महिन्यांपासून बरडीवर सातत्याने उत्खनन सुरू आहे. या जागेची अवस्था अत्यंत दयनीय अशी करण्यात आली आहे. असे असताना अद्याप त्या उत्खननास कोणताही प्रतिबंध करण्यात आलेला नाही. तर उलट आता गावाचे वैभव असलेल्या बरडीसोबत अतिशय गंभीर असा प्रकार घडत आहे. ते म्हणजे गावाच्या बरडीवर सोलर प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. यासाठी सर्रास वृक्षतोडही केली जाणार आहे. मोठमोठी झाडे कापली जात आहेत. त्यामुळे या प्रकल्पास लासगाव ग्रामस्थांचा विरोध आहे. म्हणून समस्त लासगाव वासियांच्या तीव्र भावनांचा आदर लक्षात घेता हा प्रकल्प त्वरीत रद्द केला जावा.
सद्यस्थितीत सुरू झालेली वृक्षतोड आणि प्रकल्पाचे काम त्वरित थांबवण्यात यावे आणि उत्खननावरही बंदी आणावी. कारण गावासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे या संबंधित कार्यवाही करावी, अशी मागणी लासगाव ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाला केली आहे. तसेच ही मागणी जर पूर्ण झाली नाही तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असे गावकऱ्यांनी म्हटले.
हेही वाचा : दुचाकीच्या अपघातात टँकरने 15 वर्षीय बालकाला चिरडल्याने जागीच मृत्यू, पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना