सनोपथरखम, 15 फेब्रुवारी : शेती हा प्रत्येक शेतकऱ्याचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतीतून भरघोस उत्पान्न मिळावे यासाठी तो परिपूर्ण प्रयत्न करत असतो. मात्र बऱ्याचदा अत्याधुनिक कृषी पद्धतींची अल्प माहीती असल्याने त्यांना मनाजोगे उत्पन्न मिळवता येत नाही. मात्र, जर नविन कृषी पद्धतींचा योग्य वापर केला तर कमी जागेतही अधिक उत्पन्न मिळवून भरघोस नफा मिळवता येतो हेच ओडिशा राज्यातील सनोपथरखम गावातील दिनेश चंद्रा गीरी यांनी सिद्ध केलंय.
दिनेश चंद्र गिरी हे पूर्व भारतातील ओडिशा राज्यातील सनोपथरखम या गावातील एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. मागील ४० वर्षापासून ते शेती करतात. त्यांची पत्नी बिनापानी गिरी आणि त्यांची दोन मुलेही त्यांच्यासोबत शेतात काम करतात. त्यांच्या भागात मुख्यत्वे भात पिकाची लागवड केली जाते. मात्र, दिनेश हे भात पिकासह भाजीपाला लागवडीलाही प्राधान्य देतात. टोमॅटो, मिरची यांसारख्या पिकांची त्यानी यापूर्वी लागवड केली होती. मात्र, लागवडीच्या आधुनिक पद्धतींच्या माहीतीचा अभाव असल्यामुळे त्यांनी त्याचा कधीच वापर केला नाही. त्यात भाज्यांच्या किमतीत होणारे चढ-उतार हे शेतकऱ्यांसाठी एक मोठे आव्हान असते. मात्र, काळजीपूर्वक नियोजन आणि बाजारभावाचे निरीक्षण केल्यास बाजारील बदलांशी जुळवून घेण्यास मदत होऊ शकते, असे दिनेश यांना आढळून आले.
दरम्यान, ऑक्टोबर 2021 मध्ये, त्यांनी ईस्ट-वेस्ट सीड नॉलेज ट्रान्सफर फाउंडेशन (EWS-KT) चे तांत्रिक क्षेत्र सल्लागार दिलोन मोहापात्रा यांची भेट घेतली. नॉलेज ट्रान्सफर फाउंडेशन २०१६ पासून भारतात काम करत आहे आणि त्यांनी पाच राज्यांमधील ४३ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठी आवश्यक असलेले उपयुक्त प्रशिक्षण दिले आहे.
दिलोन यांनी दिनेश यांना दुसऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाला प्रात्यक्षिक प्लॉटचे फोटो दाखवले आणि सुधारित कृषी पद्धती कशा असतात. त्याचा वापर करून भाजीपाला लागवडीतून कशाप्रकारे चांगले उत्पन्न मिळवता येते याची ओळख करून दिली. यामुळे प्रभावित होऊन, दिनेश यांनी स्थानिक नॉलेज ट्रांसफर टीमच्या मदतीने नविन कृषीपद्धतींचा वापर करून मिरची पिकाचा प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्यास सहमती दर्शवली.
अनेक नवीन पद्धती शिकून घेतल्या –
दिनेश यांनी त्याच्या शेतात २३८ चौरस मीटर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड केली. यासाठी त्यांनी जमीन तयार करण्यापासून के कापणीपर्यंत सखोलपणे काम केले. मिरचीचे रोप कसे तयार केले जाते, रोपवाटिका कशी तयार करावी, हंगामानुसार बियाणे निवड, कीटक आणि रोग ओळख आणि त्यांचे नियंत्रण तसेच झिग-झॅग लागवड पद्धती यांसारखी अनेक तंत्रे शिकून घेतली.
या पद्धतींचा अवलंब केल्यामुळे त्यांना पारंपारिक आणि सुधारित पद्धतींच्या परिणामांमधील फरक पाहिला तसेच या नवीन तंत्रांमुळे त्यांना कमी गुंतवणुकीत अधिक उत्पन्न मिळविण्यात मदत झाली. त्यांनी या प्रात्यक्षिक प्लॉटसाठी ४ हजार ५६५ रुपये गुंतवले होते यामधून त्यांना मिरचीतून जे उत्पन्न मिळाले त्यातून त्यांना ६५ हजार ४२५ रुपयांचा नफा कमावला, असे ते सांगतात.
न खचता नवीन शक्कल लढवली –
बाजारातील मागणीनुसार दिनेश यांनी मिरचीची लागवड करण्यास प्राधान्य दिले होते. त्यातून त्यांनी १३ क्विंटल (1,300 किलो) मिरचीचे उत्पन्न मिळाले. मात्र, नंतर बाजार घसरला आणि हिरव्या मिरचीच्या किमती घसरल्या. अशा परिस्थितीतही त्यांनी न खचता एक क्विंटल (100 किलोग्रॅम) मिरपूड सुकवून चांगला नफा मिळवला. या निर्णयामुळे त्यांना त्याचा चांगला आर्थिक फायदा झाला.
नॉलेज ट्रांसफरच्या माध्यमातून दिनेश यांनी ज्या नविन कृषी पद्धती शिकल्या त्यामुळे ते आनंदी आहेत.
भाजीपाल्याच्या किमतीत चढ-उतार होत असताना नियोजन कसे करावे, हेही ते शिकले. भारतातील भाजीपाल्याच्या वेगाने बदलणाऱ्या किमतींमुळे शेतकऱ्यांना नफ्याचा अचूक अंदाज लावणे आणि कोणते पीक घ्यायचे हे ठरवणे कठीण होते. त्यामुळे दिनेश यांच्यासारखे काळजीपूर्वक नियोजन आणि देखरेख केल्याने इतर शेतकर्यांनाही किमतीतील चढ उतारांचा अंदाज घेणे सोपे होऊ शकते आणि कमी जागेतीही अधिकाधिक उत्पन्न मिळवणे शक्य होते.