चाळीसगाव, 7 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. जळगाव जिल्ह्यातही गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसत आहेत. यातच आता जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातून गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव शहरात भाजपच्या माजी नगरसेवकावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात आज संध्याकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबाराची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चाळीसगावातील रेल्वे स्टेशन परिसरात भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेमध्ये महेंद्र मोरे यांना तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. दरम्यान, मोरे यांना चाळीसगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परस्पर वादातून ही घटना घडली अशी प्राथमिक माहिती आहे.
भाजपचे माजी नगरसेवक महिंद्र मोरे हे आज त्यांच्या कार्यालयात होते. यावेळी कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कार्यालयात शिरून काही कळण्याच्या आतच मोरे यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि गोळीबारानंतर कारमधून घटनास्थळावरून अज्ञात आरोपी पसार झाले. या गोळीबारात महेंद्र मोरे हे जखमी झाले आहेत. दरम्यान, या गोळीबारची माहिती मिळताच चाळीसगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेनंतर चाळीसगाव शहरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : अजित पवार गटाला मिळाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह, अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय?