भडगाव, 16 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नर्सरीत शिकणाऱ्या चार वर्षांच्या दोन मुलांचा नाल्यात पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजता समोर आली. अंश सागर तहसीलदार (वय 4, रा. आदर्श कॉलनी) आणि मयंक उर्फ संकेत ज्ञानेश्वर वाघ (वय 4, रा. बालाजी गल्ली) अशी मृत मुलांची नावे आहेत.
दोघेही भडगावातील आदर्श कन्या इंग्रजी माध्यम शाळेत नर्सरीत शिकत होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संस्थाचालकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे पुढील तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शाळेच्या परिसरात खेळत असताना हे दोन्ही चिमुकले संरक्षक भिंतीजवळ गेले. खेळता-खेळता त्यांचा तोल गेला आणि ते थेट शेजारील नाल्यात पडले. नाल्यातील पाण्यात बुडाल्याने त्या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना लगेच कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र, काही वेळानंतर शोध घेतल्यानंतर नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. पालकांनीही शाळेकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्ही मुलांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी संस्थाचालकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे पुढील तपास करत आहेत.
शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह –
या दुर्दैवी घटनेनंतर शाळेच्या हलगर्जीपणाबाबत पालकांसह नागरिकांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. शाळेच्या संरक्षण भिंतीजवळ पुरेशी सुरक्षा नसल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. शाळेची सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचा सवाल उपस्थित करण्यात येत असून या प्रकरणात जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.






