जळगाव, 10 एप्रिल : “लालपरी म्हणजे फक्त प्रवास नाही, ती लाखो कुटुंबांच्या जीवनाशी जोडलेली आशेची दोरी आहे. आईच्या पदराइतकाच विश्वास देणारी ही सेवा आता नव्या रूपात जनतेसमोर येतेय,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते आज जळगाव येथे पाच नव्या एस.टी. बसच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते.
जळगाव परिवहन विभागात सध्या एकूण 11 आगार व 15 बसस्थानके असून, 1355 वाहनांद्वारे दररोज 1.69 लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. विभागातील बस दररोज 2.51 लाख किमी प्रवास करतात आणि दरवर्षी सुमारे 119 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवतात.
“लालपरी केवळ एक गाडी नाही,
ती तर लाखोंच्या स्वप्नांची सवारी आहे!”
या सेवा फक्त प्रवाशांची संख्या सांगत नाहीत, तर विश्वास, सुरक्षितता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवतात. महिलांना ५० टक्के, अमृतज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के, तसेच अपंग प्रवाशांसाठी ७५ टक्के अशी एकूण ३२ प्रकारच्या प्रवाशांना सवलती मिळतात. विद्यार्थ्यांना शाळांपर्यंत पोहोचवण्यासाठी 2022-23 मध्ये ५२ कोटी रुपयांचा खर्च झाला असून २.६२ लाख विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, “जळगाव व चोपड्यासह ११ तालुक्यांतील १० ठिकाणी नवी बसस्थळे उभारण्यासाठी जागा निश्चित झाली आहे. यासाठी परिवहनमंत्र्यांशी चर्चा झाली असून मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ही केंद्रं साकारतील.”
जवळपास ११०० शाळा व महाविद्यालयांमध्ये बससेवा पोहोचली असून, पास वितरण थेट गावपातळीवर होत आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी इलेक्ट्रिक, सीएनजी, मिनी, मिडी, डिझेल बस यांचा वापर, तसेच ट्रॅकिंग, स्मार्ट कार्ड आणि मायक्रोप्लॅनिंगसारखी आधुनिक तंत्रज्ञाने वापरण्यात येत आहेत. “परिवहन महामंडळाचे ध्येय केवळ प्रवास पुरवणे नसून, तो सन्मानाचा, सुरक्षित व वेळेवर असावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे सांगून पालकमंत्र्यांनी लालपरीच्या नव्या पर्वाची सुरुवात जाहीर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग नियंत्रक भगवानजी जगनोर यांनी केले. सूत्रसंचालन संजय सोनार यांनी तर आभार डेपो मॅनेजर संदीप पाटील यांनी मानले. यावेळी जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे, सरपंच संघटनेचे सचिन पवार, आशुतोष पाटील, यंत्र अभियंता किशोर पाटील, उपायंत्र अभियंता सुनील भालतीडक, सुरक्षा व दक्षता अधिकारी दीपक जाधव, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, सहायक कार्यशाळा अधीक्षक मनमोहन पाटील, सहायक वाहतूक अधीक्षक मनोज तिवारी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.