मुंबई, 8 फेब्रुवारी : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मुंबईतून राज्याला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबाराने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दहिसरमधील रुग्णालयात त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
काय आहे संपूर्ण बातमी? –
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना आज संध्याकाली घडली होती. दरम्यान, त्यांच्यावर मुंबईतील दहिसर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. घोसाळकर यांना यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. दरम्यान, त्यांना तीन गोळी लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, उपचार दरम्यान, त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
गोळीबार करणाऱ्यानेही केली आत्महत्या –
मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार पैशाच्या व्यवहारातून केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वर्षभरापूर्वी त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला होता. पण आता तो मिटल्यानं ते एकत्र आले होते. मॉरिसने अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घालत नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? –
अभिषेक घोसाळकर यांना एका कार्यक्रमाकरता मॉरिस नावाच्या व्यक्तीने त्यांच्या कार्यालयात बोलावले होते. या कार्यक्रमाचे मॉरिस यांनी त्यांच्या फेसबुकवरून लाईव्ह केले होते. दरम्यान, हा कार्यक्रम संपत असतानाच मॉरिस नामक व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्या दिशेने गोळीबार केला. दरम्यान, या गोळीबारात घोसाळकर गंभीरित्या जखमी झाल्याने त्यांना दहिसरमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुसरीकडे घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली.
हेही वाचा : महाराष्ट्र हा गुन्हेगारीच्या वाटेवर जाताना दिसतोय, चाळीसगावातील गोळीबाराच्या घटनेनंतर राष्ट्रवादीची टीका