पारोळा, 24 मार्च : जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. तब्बल चार वर्षे राजकारणात पडद्यामागे राहिल्यानंतर ए. टी. पाटील पुन्हा मैदानात उतरले आहेत. ए.टी. पाटील यांनी पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची सूत्रे हाती घेतली आहेत.
राज्यात भाजप आणि शिंदे गटाची युती असताना बाजार समितीच्या निवडणुकीत ए. टी. पाटील हे थेट शिंदे गटासमोर आव्हान उभं करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ए. टी. पाटील यांनी पारोळा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी बैठकीत निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांसोबत त्यांनी चर्चा केली.
काय म्हणाले ए. टी. पाटील?
नुकतंच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. 27 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक म्हटली म्हणजे ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. आणि यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. याच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी भाजपने ही निवडणूक लढवावी, असा एकमताने निर्णय झालेला आहे, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
तसेच मागच्या वेळेस ही निवडणूक बिनविरोध झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, ही निवडणूक आपण लढवावी. राज्यात भाजप आणि शिंदे गटाची युती आहे. परंतु सध्यातरी याठिकाणी आमच्याकडे युतीचा असा पर्याय याठिकाणी आला नाही. भविष्यात असा कोणता युतीचा प्रस्ताव आला तर त्यावर वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी खासदार ए टी पाटील हे तब्बल चार वर्षानंतर राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. आगामी काळात होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ए टी पाटलांनी सूत्र हाती घेतली आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे ए. टी. पाटील सक्रिय राजकारणापासून अलिप्त झाले होते. तसचे गेल्या चार वर्षात ते भाजपच्या कुठल्याही व्यासपीठावर आले नव्हते.
मध्यंतरी जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु पक्षाने माघार घेण्यास भाग पाडल्याने ते बाजूला झाले होते. आता मात्र बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने ते पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. यावेळी ते थेट शिंदे गटाला आव्हान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.