संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा/ मुंबई, 28 मे : राष्ट्रवादी काँग्रेसेच सर्वेसर्वा शरद पवार यांचे निष्ठावान समजले जाणारे तथा माजी खासदार वसंतराव मोरे यांच्या दोन्ही मुलांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. वसंतराव मोरे यांची दोन्ही मुले रोहन व पराग मोरे यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप प्रदेशचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, विधानसपरिषदेचे सभापती राम शिंदे तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या मुख्य उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
रोहन व पराग मोरे यांचा भाजपमध्ये प्रवेश –
शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक तथा माजी खासदार वसंतराव मोरे यांचे चिरंजीव पराग मोरे तसेच रोहन मोरे, उद्धवसेनेचे माजी जि. प. सदस्य नाना महाजन यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेश संघटक विजय चौधरी, रवींद्र चव्हाण, आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, भाजप जिल्हाउपाध्यक्ष मधूकर काटे यांच्यासह भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
पारोळा-एरंडोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का –
वसंतराव मोरे 2007 साली खासदार म्हणून एरंडोल मतदारसंघातून निवडून आले होते. वसंतराव मोरे हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते समजले जातात. मात्र, त्यांच्या दोन्ही पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पारोळा-एरंडोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या पक्षांतरामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे.