मुंबई, 17 मार्च: रब्बी हंगाम २०२५-२६ साठी सुरू असलेल्या सहायक स्तरावरून करावयाच्या ई-पीक पाहणी नोंदणीला ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.
महाराष्ट्र विधानसभा नियम ४७ अंतर्गत केलेल्या निवेदनात मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यात सध्या डिजिटल क्रॉप सर्व्हे या ॲपच्या माध्यमातून ई पीक पाहणी नोंदणी होते. राज्यात रब्बी हंगाम २०२५-२६ अंतर्गत १० डिसेंबर २०२५ ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत शेतकरी स्तरावरून पीक नोंदणी सुरू होती.
मात्र, पीक पाहणी क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ ५५.६९ टक्के इतक्या क्षेत्राची पीक नोंदणी पूर्ण झाली आहे. सध्याच्या प्रगतीचा वेग लक्षात घेता ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे शक्य नाही. पीक नोंदणी न झाल्याने नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज इ. लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी सहायक स्तरावरून करावयाच्या पीक नोंदणीला ३१ मार्च २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी नोंदणी १०० टक्के पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.






