जळगाव : नागरिकांना सेवा देण्यामध्ये काही अडचणी असतील तर आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक विभागाच्या महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी केले. नाशिक विभागाच्या महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी या गेल्या 10 ते 12 मार्च दरम्यान जळगाव जिल्ह्याअंतर्गत शासकीय दौरावर आल्या होत्या. यावेळी त्या येथे बोलत होत्या.
मंगळवारी दिनांक 11 मार्च बोदवड येथे चित्रा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 च्या अंमलबजावणी बाबत आढावा बैठक मुक्ताईनगर येथील एस. एम. कॉलेज, मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर येथे दुपारी 3 वाजता पार पडली. या बैठकीचे प्रास्ताविक तहसिलदार मुक्ताईनगर यांनी केले. तसेच तालुका स्तरावरील लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अंमलबाजणी बाबत तसेच आपले सरकार पोर्टलवरील अहवालाबाबत माहिती दिली. या बैठकीस तालुकास्तरावरील उपस्थित सर्व विभाग प्रमुख यांना आयुक्तांनी सुचना दिल्यात.
बुधवार दिनांक 12 मार्च रोजी चित्रा कुलकर्णी यांनी भुसावळ येथील ई-सेवा केंद्र व शासकीय कार्यालयांची तपासणी केली. दुपारी 12 वाजता तहसिल कार्यालय येथे विविध तालुका प्रमुख यांची आढावा बैठक चित्रा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आयुक्त चित्रा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 चे अंमलबजावणी बाबत आढावा बैठक भुसावळ येथील तापी सभागृह उपविभागीय अधिकारी भुसावळ भाग भुसावळ यांचे कार्यालय येथे पार पडली. या बैठकीचे प्रास्ताविक तहसिलदार भुसावळ यांनी केले. तसेच तालुका स्तरावरील लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अंमलबाजणी बाबत तसेच आपले सरकार पोर्टलवरील अहवालाबाबत माहिती दिली.
तसेच जळगाव जिल्हातील सर्व गटविकास अधिकारी/ सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या सोबत जिल्हापरिषद येथे प्रपत्र भरणे व इतर कामकाजाबाबत चित्रा कुलकर्णी यांनी आढावा बैठक घेतली.
या बैठकींमध्ये आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी तालुकास्तरावरील उपस्थित सर्व विभाग प्रमुख यांना सुचना दिल्या. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा कायदा आहे. जनतेच्या सेवेची पुर्तता करतांना शासकीय अधिकाऱ्यांनी आपली संवेदनशीलता अधिक प्रगल्भ करावी, अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांपर्यंत कायदा पोहोचवण्याची गरज असून आपल्या कार्यालयामध्ये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या मागणी अर्जाच्या संख्येत वाढ झाली पाहिजे अशा सूचना आयुक्त यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
शासकीय नोकरी म्हणजे लोकसेवा आहे, त्यामुळे अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी याकडे केवळ नोकरी म्हणून न पाहता समाजाप्रती आपलेही काही देणे लागते ही भावना अंगी बाळगून जनतेला वेळेत सेवा देण्याचे काम करावे, तसेच चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा आयोगामार्फत गौरव करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. कारण नसतांना सेवा देण्यास विलंब झाला तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची कायद्यात तरतूद असून अशी वेळ कुठल्याही अधिकारी/कर्मचारी यांच्यावर येवू नये. सेवा देण्यामध्ये काही अडचणी असतील तर आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले.