वाशिम, 25 जून : विदेशात शिक्षण घेण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. मात्र, विविध स्कॉलरशिपच्या माध्यमातून भारतातील फार कमी विद्यार्थ्यांना तिथे शिक्षणाची संधी मिळते. त्यात घरात अठराविश्व दारिद्र्य असेल आणि अशा घरातील मुलगा जगातील अंत्यत प्रतिष्ठित एकाच वेळी दोन स्कॉलरशिप मिळवत असेल, हे फारच दुर्मिळ. मात्र, विदर्भाच्या एका मुलाने हे स्वप्न सत्यात उतरवून दाखवलं आहे. वैभव सोनोने, या तरुणाचे नाव असून तो मूळ वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या पेडगाव गावातील रहिवासी आहे.
वैभव सोनोने या तरुणाने पहिल्याच प्रयत्नात जगातील अत्यंत प्रतिष्ठित अशा दोन मानाच्या स्कॉलरशिप मिळवल्या आहेत. वैभवला 2023-24 साठी अत्यंत प्रतिष्ठित चेवेनिंग आणि कॉमनवेल्थ शेअर्ड स्कॉलरशिप मिळाल्या आहेत. त्याला परदेशातील 18 विद्यापीठांकडून ऑफर लेटर आले होते. त्यात लीड्स विद्यापीठात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये त्याने कॉमनवेल्थ ही स्कॉलरशिप निवडली असून तो आता इग्लंडमध्ये यूनिव्हर्सिटी ऑफ लीड्स या विद्यापीठात Envament and Development या विषयात पदव्युत्तर शिक्षणासाठी जाणार आहे. वैभवच्या या यशानंतर सुवर्ण खान्देश लाईव्हच्या टीमने त्याच्याशी संवाद साधला. यावेळी त्याने आपला प्रवास कसा झाला, हा अनुभव नेमका कसा होता, या सर्व विषयावंर सविस्तर संवाद साधला. जाणून घेऊयात, विदर्भातील वैभवचा हा यशस्वी आणि तितकाच संघर्षमय प्रवास.
वैभव याच्या कुटुंबातील सदस्य हे मिस्तरी काम करतात. सुरुवातीला त्याचा परिवार हा नाशिकला राहायचा. पण 2001 मध्ये त्याच्या वडिलांचा अपघात झाल्यानंतर ते सर्व लोक त्यांच्या गावी परत आले. मग गावाच्या शाळेतच त्याचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. परिवारात शिक्षणाचे महत्त्व होते. परिस्थिती अभावी वडील शिकू शकले नाही. पण मी शिकावं अशी परिवाराची इच्छा होती. यानंतर 2007 मध्ये विदर्भातील लोणी येथे त्याला पुढील शिक्षणासाठी पाठवण्यात आले. तिथे त्याने 12 वीपर्यंतचे शिक्षण घेतले. तिथले जे प्राचार्य होते, कल्याण महाराज जोशी त्यांच्याकडून वैभवला तिथल्या वाचनालयाची चावी त्याला मिळाली. यानंतर मग वाचनाची आवड सुरू झाली. यानंतर त्याचा बराचसा वेळ तिथे वाचनालयात गेला. त्याला 2011 यावर्षी दहावीत 66 टक्के मिळाले आणि तिथल्या सेंटरमध्ये तो पहिला आला होता.
यानंतर त्याने 11 वीला सायन्स घेतले. मात्र, तिथे त्याचा जम न बसल्याने त्याने नंतर आर्ट्स विषयात प्रवेश घेतला. यादरम्यान, त्याला दीपक जोशी नावाच्या शिक्षकांनी खूप मदत केली. तसेच त्याने 11 वी आणि 12 वी या कालावधीत विविध विषयांचे प्रचंड वाचन केले आणि याचाच फायदा त्याला बारावीत झाला. त्याला 12 वीत 83 टक्के मिळाले होते. त्यात अर्थशास्त्र या विषयात 100 पैकी 94 टक्के गुण मिळाले. यानंतर डीएड करायचा विचार डोक्यात आला. पण तु मोठ्या विद्यापीठात चांगल्या ठिकाणी शिकायला जा, असा सल्ला त्याला जोशी सरांनी दिला होता. त्यानंतर त्याने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला.
पुण्यातील तो प्रसंग आजही आठवतो तेव्हा…
12 वी नंतर फर्ग्युसन कॉलेजला प्रवेश घ्यायचा होता. माहिती काढली असता एकच दिवस प्रवेशासाठी फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख उद्याच आहे, असं त्याला सांगण्यात आलं. यानंतर घरी आल्यावर आईला म्हणालो की, मला आजच्या आज पुण्याला जायचंय. मात्र, पुण्याला जायलाही त्यावेळी घरी पैसे नव्हते. पण वडिलांनी गावातील काही लोकांना विचारले पण पैशाची व्यवस्था झाली नाही. पण त्याच वेळी गावातील फकिरा अंबोरे नावाचे गृहस्थ रात्री पाऊस सुरू असतानाही पैसे द्यायला घरी आले. यानंतर ते पैसे घेऊन मी पुण्याला आलो. पण फॉर्म भरल्यानंतर मला तीन दिवसांनी लिस्ट लागणार असल्याचे सांगितले.
या तीन दिवस दरम्यान मी तिथंच बसस्टँड, रेल्वे स्टेशनवर राहिलो. पण यानंतर सुदैवाने माझा नंबर फर्ग्युसन कॉलेजला बीए या कोर्सला लागला. हा प्रसंग आठवताना अंगावर आजही शहारे येत असल्याचे वैभव सांगतो. यादरम्यान, ठाण्यातील विद्यादान सहायक मंडळ (VSM) या संस्थेने त्याला आर्थिक मदत केल्याचेही त्याने सुवर्ण खान्देश लाईव्ह सोबत बोलताना सांगितले.
तो सांगतो, आई एक गोळी खायची आणि मग कामाला जायची, त्याची घरची परिस्थिती हलाखीची होती. तर वडील म्हणायचे, आपल्या चार पिढ्या गरिबीत गेल्या आणि तु जर काम करायला सुरुवात केली, आणि तुझे जे उमेदीचे वर्ष जर यात घालवले तर आपल्या पुढच्या चार पिढ्याही अशाच जातील. त्यामुळे तु शिक आमची काळजी नको करू. आम्ही एकवेळ उपाशी राहू, पण तु शिक्षणाकडे लक्ष दे, असा सल्ला वडिलांनी दिला होता.
दरम्यान, याच काळात मेळघाटातील डॉ. रविंद्र कोल्हे यांच्यासोबतही त्याने काम केले. त्यांच्या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणारे तरुणाई हे शिबिर कोऑर्डिनेट करण्याची संधी मला मिळाली आणि यामुळे माझ्यातील लीडरशीप क्वालिटी विकसित झाली आणि इथूनंच मग आपण ग्रासरूटवर जाऊन काम करायला हवं, अशी प्रेरणा मिळाल्याचं तो सांगतो. यानंतर त्याला अजीज प्रेमजी विद्यापीठात एम. ए. इन डेव्हलपमेंट या कोर्ससाठी त्याला प्रवेश मिळाला. इथे प्रोफेसर हरिणी नागेंद्र यांनी त्याला खूप चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केले. त्यांची खूप मदत झाल्याचं तो सांगतो.
नोकरीच्या ठिकाणीचा तो अनुभव –
एम. ए. केल्यानंतर त्याला प्रदान या संस्थेत मध्यप्रदेशात नोकरी मिळाली. त्याला मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यातील धमन पानी गावात नोकरीच्या निमित्ताने राहायचा योग आला. या गावात त्यावेळी म्हणजे 2018 मध्ये पाणी, वीज, रस्ता, नेटवर्क नाही, अशी परिस्थिती होती. तसंच याचदरम्यान, किडनी चोर गावात येत आहे, अशा अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी तेथील लोकांना असं वाटलं मीपण किडनी चोर आहे. त्यामुळे त्याला मारहाणही करण्यात आली होती. तसंच त्या तिथून निघून जाण्यासही सांगण्यात आलं होतं. पण त्यावेळी मी विचार केला की, ही लोकं अज्ञानी आहेत. त्यामुळे या लोकांच्या अज्ञानाला दूर करेन आणि इथेच राहील. मग यानंतर त्याला हवा तसं बदलं तिथल्या लोकांमध्ये झाला. हळूहळू लोकांचा संवाद झाला. मग यानंतर तिथे पाणी अडवण्यासाठी प्रयत्न केले. यादरम्यान, तिथल्या लोकांना मनरेगाच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. लोकांचं आरोग्य सुधारलं.
याचदरम्यान, पर्यावरण या विषयात आणखी पुढे शिकलं पाहिजे असं वाटलं. यानंतर एकलव्य या संस्थेचे आणि चेव्हनिंग स्कॉलर राजू केंद्र यांनी मार्गदर्शन केले तसेच माझा आत्मविश्वास वाढवला. यानंतर एकलव्यची खूप मोलाची मदत झाली. मेंटॉर खूप चांगले मिळाले. त्यामुळे हे सर्व शक्य झालं असं तो सांगतो. त्याचा हा प्रवास महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्याच्या या पुढच्या प्रवासाला टीम “सुवर्ण खान्देश लाईव्ह”कडून खूप खूप शुभेच्छा!