जळगाव, 24 डिसेंबर : राज्यातील सर्वत्र भागात मागील दोन आठवड्यात कडाक्याची थंडी पडली होती. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात होत्या. मात्र, आता ऐन हिवाळ्यात राज्याला पावसाचा इशारा देण्यात आला असून वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीटचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रात गारपीटचा इशारा –
उत्तर महाराष्ट्रात केळी, द्राक्ष, पपईसह भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. दरम्यान, ऐन हिवाळ्यात गारपीटचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे गारपीट झाल्यास उत्तर महाराष्ट्रमध्ये मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्याच्या अन्य भागांत ही पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यास रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यत आहे.
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 26 रोजी डिसेंबर- धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर 27 डिसेंबर रोजी नाशिक, पुणे, नगर, जळगाव, धुळे, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.
हेही वाचा : Raju Mama Bhole : जळगाव शहराच्या विकासासाठी राजूमामांचं व्हिजन काय, नागपूर येथून विशेष संवाद