मुंबई, 14 जुलै : राज्यात आज दिवसभरात विविध भागात जोरदार पाऊस बरसला. गेल्या दोन-तीन दिवसापासून हलक्या स्वरूपात बरसणाऱ्या पावसाने आज जोरदार हजेरी लावली. राज्यात अपेक्षित असा पाऊन न झाल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती. मात्र, पावसाने शनिवारी नागपूरसह विदर्भातील इतर भागातही दमदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.
राज्यात भागात जोरदार पावसाची हजेरी –
हवामान विभागाने आज दिवसभरासाठी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’जारी केला होता. तर ठाणे, रायगड आणि पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर ‘ऑरेंज’ अलर्ट दिला होता. दरम्यान, या भागात आज पावसाने जोरदार हजेरी लावली.
भिवंडीत मुसळधार पाऊस –
भिवंडी शहरात काल पासून जोरदार पाऊस बरसतोय. दरम्यान, या पावसामुळे कामवारी नदीची पातळी वाढल्याने नदीकाठी असलेल्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इदगाह रोड परिसरात शेकडो घरात पाणी शिरले असून बाजापेठ, तीन बत्ती, भाजी मार्केटमध्ये शेकडो दुकानात देखील पाणी शिरले आहे. बाजापेठ, तीन बत्ती, भाजी मार्केट, कल्याण नाका, कमला हॉटेल, तांडेल मोहल्ला, ईदगाह रोड, म्हाडा कॉलनी, नदी नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून येत आहे. यामुळे जनजीवन विस्कळित झाल्याचे देखील समजते. दरम्यान, परिसरातील शेकडो वाहन देखील पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
जळगाव जिल्ह्याचा काय आहे हवामान अंदाज? –
जळगाव जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत हलक्या स्वरूपात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात आज काही भागात ढगाळ वातावरण होते. दरम्यान, आज आणि उद्या जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रत्नागिरीत उद्या शाळांना सुट्टी –
गेल्या दोन दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस पाहता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी (15 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयांचा समावेश असून त्या संबंधीचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जारी केला आहे.
हेही वाचा : ‘आमच्या 50 जणांच्या टीमने काढलेली विकेट कुणीही…,’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?