जळगाव, 29 जून : आठवड्याभरापासून राज्यात सर्वत्र पाऊस पडतोय, असे असताना हवामान विभागाने येत्या 30 जूनपर्यंत राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली आहेत. मात्र, ज्या ठिकाणी कमी पाऊस झाला आहे. त्याठिकाणचे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.
राज्यात 30 जूनपर्यंत जोरदार पावसाचा इशारा –
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उद्यापर्यंत म्हणजेच 30 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याचा काय आहे हवामान अंदाज? –
जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात पुर्ण झाल्या असून शेतीकामांना वेग आला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज हलक्या स्वरूपाचा तर उद्या विजेच्या गडगडाटांसह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू, चार प्रवासी गंभीर जखमी