जळगाव, 26 नोव्हेंबर : सध्या राज्यातील तापमानात मोठी घट पाहायला मिळत असून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील वातावरणावर हा परिणाम झाला आहे. दरम्यान, सकाळी व रात्री थंडी वाढली असल्यामुळे अनेक जिल्हे गारठले आहेत. यामध्ये जळगावसह पुणे, नाशिक सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात तापमानात कमी झाले आहे.
हवामान अंदाज नेमका काय? –
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किमान किंवा रात्रीच्या तापमानानंतर आता काही शहरातील कमाल किंवा दिवसाच्या तापमानात लक्षणीय घट होत आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरातील कमाल तापमान सोमवारी 28.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी कमाल तापमान होते. दरम्यान, किमान तापमान 12.1अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे आजपर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी किमान तापमान आहे.
राज्यात थंडी वाढणार –
कमी होणारी आर्द्रतेची पातळी आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होत असल्याने पुढील पाच दिवस तापमान आणखी घट होण्याची शक्यता आहे. या वेळी शहरात पहाटे धुके पडण्याची शक्यता असून हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जळगावात थंडी वाढणार –
जळगाव जिल्ह्याचे आजचे कमाल तापमान हे 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 12 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडी वाढली असून येत्या आठवड्याभरात कडाक्याची थंडी पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हेही पाहा : Kishor Appa Patil Hattrick : ऐतिहासिक विजयानंतर आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? पहिलीच मुलाखत..