जळगाव, 16 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय व आदर्श कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, ग्रामपंचायती व शासकीय विभागांना पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ आणि आमदार सुरेश (राजू मामा) भोळे यांच्या हस्ते गौरवविण्यात आले.
साहेबराव चौधरी यांचा स्वातंत्र्यदिनानिमित सन्मान –
स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर नि पाचोरा तालुक्यातील होळ येथील जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक साहेबराव चौधरी यांचा पुण भारत अभियानंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ तसेच आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी निपुण भारत अभियान अंतर्गत पायाभूत साक्षारता व संख्याज्ञान क्षमता विकसित करण्यात उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल साहेबराव चौधरी यांना “निपुण प्रेरक” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
निपुण भारत अभियान नेमकं काय? –
निपुण भारत अभियान हा भारत सरकारचा 2021 पासून राबवला जाणारा उपक्रम असून इयत्ता तिसरीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना नीट वाचता, लिहिता आणि साधे गणित करता यावे हा यामागचा उद्देश आहे. 2026 पर्यंत देशातील प्रत्येक मुलगा/मुलगी मूलभूत साक्षरता आणि अंकगणितात प्रवीण व्हावा, हे या अभियानाचे ध्येय आहे.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्या कामगिरीबद्दल गौरव –
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण विकास, महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, पोलीस सेवा, जलव्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, सौरऊर्जा प्रकल्प, सामाजिक कार्य आदी क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती, महिला बचतगट, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्हे आणि रोख पारितोषिक देण्यात आले.
View this post on Instagram
यांची होती उपस्थिती –
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल , महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे,विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, पुरस्कार विजेते, मान्यवर, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले. त्यात त्यांनी सध्या जिल्ह्यात सुरु असलेल्या विकास कामांची, योजनांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अपूर्वा वाणी आणि सरीता खाचणे यांनी केले.
जि. प. होळ शाळा जळगाव जिल्ह्यात 1 नंबर –
मुख्यमंत्री माझी शाळा अभियानात पाचोरा तालुक्यातील जि. प. शाळा होळ या शाळेला जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. शाळेला 11 लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले. येथील शिक्षकांच्या मेहनतीच्या बळावर शाळेला हा पुरस्कार काही महिन्यांपूर्वी मिळाला. यामध्ये या शाळेतील शिक्षक साहेबराव चौधरी यांचेही मोठे योगदान आहे. साहेबराव चौधरी यांची ख्याती एक आदर्श शिक्षक अशी आहे. त्यामुळे एका खऱ्या आदर्श शिक्षक, विद्यार्थीप्रिय, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी सदैव तत्पर असणारे साहेबराव चौधरी यांचे परिसरात अभिनंदन केले जात आहे.