ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 23 सप्टेंबर : पाचोरा तालुक्यातील हडसन बसस्थानक जवळ काल 22 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास आयशर व दुचाकीमध्ये अपघाताची घटना घडली. या घटनेत दुचाकीस्वारास जबर मार लागल्याने ते गंभीररित्या जखमी झाले. यावेळी माजी जि.प. सदस्य पद्मसिंह पाटील यांनी याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सहकाऱ्यांसह जखमी रूग्णास जळगावला हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. राधेश्याम माहूर (वय 39, रा. पिंपळगाव हरे.) असे मयताचे नाव आहे.
माजी जि. प. सदस्य पद्मसिंह पाटील यांना सदर अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जळगावरून जिल्हाधिकारी देखील पाचोऱ्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येत असताना ते हडसन जवळ थांबले. यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील उपस्थितांना आवश्यक त्या सूचना केल्या. दरम्यान, पदमबापू पाटील यांनी अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या राधेश्याम माहूर यांना जळगावातील आर्किड हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याने उपचार दरम्यान मृत्यू –
मुलाच्या शाळेच्या कागदपत्रांसाठी राधेश्याम माहूर हे जळगावाला जात होते. मात्र, हडसनमध्ये त्यांचा दुर्दैवी अपघात झाला आणि यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले. दरम्यान, आर्किड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. पिंपळगाव (हरे.) येथे आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.