चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 3 ऑगस्ट : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जर भाजपने स्वबळाचे संकेत दिले असतील तर मी देखील स्वबळाची तयारी केली आहे, असा इशारा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिला. तसेच स्वबळावर जर निवडणूक झाली तर मला माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देता येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपने स्वबळाचे संकेत दिल्याच्या माध्यमांच्या प्रश्नावर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी हे महत्त्वाचे विधान केले.
नेमकं काय म्हणाले किशोर आप्पा पाटील –
माध्यमांशी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, ‘जर भाजपने स्वबळाचे संकेत दिले असतील तर मी देखील स्वबळाची तयारी केली आहे. कारण स्वबळावर जर निवडणूक झाली तर मला माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देता येईल. अडचण माझ्यासमोर नाही. तर त्यांच्यासमोर आहे. वैशूताई म्हणतील माझे इतके (कार्यकर्ते) घ्या, दिलीपभाऊ म्हणतील माझे इतके (कार्यकर्ते) घ्या, अमोलभाऊ म्हणतील माझे इतके (कार्यकर्ते) घ्या आणि भाजपचे खरे निष्ठावान? हे तिन्ही उपरे आहेत. यांचा आणि भाजपचा काहीच संबंध नाही. पण भाजपचे खरे निष्ठावान म्हणतील आम्ही कुठे जाऊ. त्यांना जर अजूनही झावऱ्या, पट्ट्या उचलायच्या असतील तर त्यांनी बाजूलाच थांबावं आणि तिनही उपऱ्यांच्या मागे जावं’, असा शब्दात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी जोरदार टीका केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपने स्वबळाचे संकेत दिल्याच्या माध्यमांच्या प्रश्नावर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी हा महत्त्वाचा इशारा दिला.
जनता, कार्यकर्ते माझ्यासोबत –
तसेच कोण कुठल्या पक्षात जात आहे, मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. मला माझ्या मतदारसंघातील जनतेवर प्रचंड विश्वास आहे. तिकडे नेते आहेत. पण जनता आणि कार्यकर्ते खऱ्या अर्थाने किशोर आप्पांच्या पाठीशी उभी आहे. माझा एकही दिवस असा जात नाही, ज्यादिवशी मी 5-50 कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करत नाही. इतका प्रचंड ओघ कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे तिकडे नेते आणि इकडे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या भरवशावर या किशोर आप्पांची वाटचाल पुढे चालत राहील, असेही आमदार किशोर आप्पा पाटील यावेळी म्हणाले.
दरम्यान, आगामी काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महायुती ही संयुक्तपणे निवडणुकांना सामोरे जाणार की, स्वबळावर लढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.