मुंबई, 17 मे : जगाला दहशतवादाविरुद्ध कठोर संदेश देण्यासाठी केंद्र सरकारने आता 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार केले असून प्रत्येक शिष्टमंडळात विविध राजकीय पक्षांचे खासदार, प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती आणि अनुभवी राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश असेल. तसेच केंद्र सरकारने तयार केलेल्या 7 शिष्टमंडळांपैकी दोन शिष्टमंडळांचे नेतृत्व महाराष्ट्रातील दोन खासदार करणार आहेत.
शिष्टमंडळ नेमकं काय करणार? –
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताचा संघर्ष सुरू असताना केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि यामध्ये सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, ही शिष्टमंडळे लवकरच जगातील प्रमुख मित्र राष्ट्रांना भेट देणार असून या भेटीदरम्यान शिष्टमंडळे दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध भारताचा राष्ट्रीय संकल्प आणि कठोर भूमिका जगासमोर मांडणार आहेत. तसेच हे शिष्टमंडळ जगाला दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलेरन्स ‘Zero tolerance’ चा भारताचा मजबूत संदेश देतील.
सात शिष्टमंडळांचे नेतृत्व खालील सदस्यांकडे –
- शशि थरूर, (काँग्रेस)
- रविशंकर प्रसाद, (भाजप)
- संजय कुमार झा, (जेडीयू)
- बैजयंत पांडा, (भाजप)
- कनिमोळी करुणानिधी, (डीएमके)
- सुप्रिया सुळे, (राष्ट्रवादी काँग्रेस (राशप))
- श्रीकांत एकनाथ शिंदे, (शिवसेना)
दोन शिष्टमंडळांचे महाराष्ट्रातील ‘हे’ दोन खासदार करणार –
केंद्र सरकारने आता 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार केले आहे. यामध्ये एका शिष्टमंडळाचे नेतृत्व शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार सुपूत्र श्रीकांत शिंदे तर एका शिष्टमंडळाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे करणार आहेत. दरम्यान, या सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या माध्यमातून भारत जगाला दहशतवादाविरुद्ध एकजूट होण्याचे आणि कठोर पाऊले उचलण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात ड्रोन उडविण्यावर 3 जूनपर्यंत बंदी लागू; नेमकी काय आहे बातमी?