नवी दिल्ली, 7 मे : पहलगाममध्ये दशहतवादी हल्लानंतर देशभरात दहशतवाद्यांविरोधात संतापाची लाट उसळली. यानंतर दहशतवादविरोधात सरकारने मोठी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी होत होती. अशातच पहलगाम हल्ल्याच्या पहिल्या दिवसापासून केंद्र सरकारच्या सुरक्षादलांतील अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठका पार पडत होत्या. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून काहीतरी मोठी कारवाई केली जाणार, अशी शक्यता वर्तविली जात होती. अशातच काल मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांच्या मागावर असलेल्या भारतीय वायुदलाने एअर स्ट्राईक करत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोठी कारवाई केलीय.
Operation Sindoor मध्ये नेमकं काय घडलं? –
भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांनी संयुक्तपणे ‘ऑपरेशन सिंदूर’ दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केलीय. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय जवानांनी पाकिस्तान हद्दीतील एकूण 9 दहशतावाद्यांची तळे उद्ध्वस्त केली आहेत. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर मुख्यालय आणि लष्कर-ए-तैयबाचे मुरीदके लपण्याचे ठिकाण असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईत तिन्ही दलांनी त्यांच्या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केलाय. दरम्यान, पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही तळावर हल्ला झालेला नसून फक्त दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.
9 दहशतवादी तळे उद्ध्वस्त –
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर मुख्यालय आणि लष्कर-ए-तैयबाचे मुरीदके लपण्याचे ठिकाण असल्याचे समजते. विशेषतः जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे बहावलपूर आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर असल्याने भारताने थेट आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला करत दहशतवाद्यांना नेस्तानाबूत केलंय. बहावलपूर, मुरीदके. मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबर, चक अमरू, सियालकोट या दहशतवाद्यांच्या तळाचा यामध्ये समावेश होता.
‘ऑपरेशन सिंदूर’वर पंतप्रधान मोदींचं रात्रभर लक्ष –
भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांनी संयुक्तपणे ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहिम राबविण्यात आली. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून केली जात असलेल्या कारवाईबाबतची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली जात होती. यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’वर पंतप्रधान मोदींचं रात्रभर लक्ष होतं, असे सांगितले जात आहे.
हेही वाचा : भुसावळसह राज्यात उद्या राज्यात 16 ठिकाणी मॉक सिक्युरिटी ड्रिलचे आयोजन, नागरिकांना नेमकं काय शिकवलं जाणार?