नागपूर – देशभरातील तसेच विदर्भातील कंत्राटदारांनी माध्यम संवाद क्षेत्रातील आयआयएमसी अमरावती या सर्वोच्च संस्थेच्या बांधकाम निविदा प्रक्रियेला गती देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी केले.
पश्चिम विदर्भातील अमरावती येथे 2011-2012 साली स्थापन झालेल्या आयआयएमसीच्या उभारणीबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू काल नागपूर येथे केंद्रीय लोक निर्माण विभाग नागपूरचे मुख्य अभियंता प्रदीप दीक्षित यांच्याकडून या बांधकामाच्या आढावा घेतला. तसेच माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आकाशवाणी, दूरदर्शन, पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो या कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये आयआयएमसीच्या काही शैक्षणिक संकुलाचे बांधकाम पूर्ण करून मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच 2011-2012 मध्ये अमरावती शहरात स्थापना झालेली आयआयएमसी ही संस्था लवकरच आपल्या कायमस्वरूपी शैक्षणिक परिसरात कार्य सुरू करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
निविदा दाखल करण्याची शेवटची तारीख –
केंद्रीय शिक्षण मंत्रालया अंतर्गत अभिमत विद्यापीठ त्याचप्रमाणे माहिती प्रसारण मंत्रालय अंतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या भारतीय जनसंचार संस्था आयआयएमसीच्या पश्चिम विभागीय अमरावती केंद्राचे बांधकाम केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाद्वारे 90 कोटी रुपयांच्या तरतुदीने बडनेरा येथील सुमारे 15 एकर जागेवर होत आहे. यासाठी केंद्रीय लोक निर्माण विभाग-सीपीडब्ल्यूडीच्या संकेतस्थळावर etender.cpwd.gov.in निविदा मागवल्या जात असून निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर आहे.
नवीन कॅम्पसमध्ये काय सुविधा असणार?
या नवीन शैक्षणिक संकुलामध्ये प्रशासकीय तसेच शैक्षणिक इमारत त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे वसतीगृह आणि कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर्स तसेच 200 आसन क्षमतेचे सभागृह या बांधकामाचा समावेश असणार आहे.
आयआयएमसीची देशभरात 5 प्रादेशिक केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषांमध्ये पत्रकारिता अभ्यासक्रम चालवले जातात. महाराष्ट्रातील अमरावती, ओडिशातील धेनकनाल, मिझोराममधील आयझॉल, जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू आणि केरळमधील कोट्टायम सध्या एकत्रितपणे पत्रकारितेतील पदव्युत्तर अभ्यासक्रम संचालित करत आहेत.
दरम्यान, या आढावा बैठकीत आकाशवाणी नागपूरचे उपमहासंचालक रमेश घरडे, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग- नागपूरचे मुख्य अभियंता प्रदीप दीक्षित, आयआयएमसी अमरावतीचे प्रादेशिक संचालक डॉ. राजेश कुशवाह आणि इतर अधिकारी उपस्थित होते.