मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 20 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चोपडा तहसील कार्यालयात चोपडा विधानसभा मतदारसंघात कार्यरत असणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना –
मतदान केंद्रांवर दिल्या जाणाऱ्या सर्व मूलभूत सेवा सुविधा अद्ययावत करणे, केंद्रांवर स्वयंसेवक नेमणे, मतदान केंद्रांवर प्रतीक्षा कक्ष स्थापन करणे, गृह मतदानासाठी पात्र असणाऱ्या मतदारांची माहिती मिळवणे आणि त्यांना गृह मतदानाचा अधिकार प्राप्त करून देणे यासंदर्भातल्या महत्त्वपूर्ण सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी क्षेत्र अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.
सर्व बी एल ओ यांनी दिलेल्या मुदतीच्या आत सर्व मतदारांपर्यंत मतदान चिठ्यांचे वाटप करावे. मतदाराला त्याच्या मतदान केंद्राविषयी माहिती द्यावी. यावेळी तालुक्याच्या सीमारेषांवर मुख्य वाहतुकीच्या आणि चोर रस्त्यांवर तपासणी अधिकाऱ्यांनी कसून तपासणी करावी. किमान 50 टक्के मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग होणार आहे. पोलीस विभागाने कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा विविध सूचना यावेळी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
निवडणुकीसंबंधी फेक न्युज पसरवण्यांवर कार्यवाही –
निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार असून झालेल्या प्रशिक्षणानंतर त्यांची परीक्षा देखील घेण्यात येणार आहे. निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी टपाली मतपत्रिकांची सोय करण्यात आलेली आहे. मीडिया पक्षाच्या वतीने सोशल मीडिया आणि वृत्तपत्र तथा वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांची नोंद घेण्यात यावी आणि निवडणुकीसंबंधी फेक न्युज पसरवण्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळेस केल्या.
यांची होती उपस्थिती –
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत उपजिल्हाधिकारी तथा चोपडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, चोपडा तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, तसेच पोलिस उप विभागीय अधिकारी चोपडा पोलिस अधिकारी, वन क्षेत्रपाल थोरात, कृषी अधिकारी साळूंके , गटविकास अधिकारी महेश पाटील, नगरपालिका मुख्याधिकारी राहुल पाटील,सर्व विभागांचे विभाग प्रमुख व क्षेत्रीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : शेतीपिकांच्या नुकसानामुळे शेतकरी चिंतेत, आज पावसाचा येलो अलर्ट, जळगावचा हवामान अंदाज काय?