चंद्रकांत दुसाने, प्रतिनिधी
जळगाव – विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 11 जागांवर महायुतीने दणदणीत विजय मिळाला आहे. एकीकडे राज्यात आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू असताना स्थानिक पातळीवर मात्र, जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागले आहे. महायुतीने विधानसभेत जोरदार यश मिळवल्यानंतर आता आगामी जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीच्या नेत्यांचा तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रलंबित असल्याने सातत्याने विरोधकांडून त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, आता विधानसभा निवडणूक पार पडली असून आगामी 3 महिन्यांमध्ये जिल्हा परिषदा तसेच महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक यश मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मात्र चांगलीच मेहनत करावी लागणार आहे.
सध्या जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकींना सामोरे जाताना महाविकास आघाडीला आणखी मोठी तयारी करावी लागणार आहे.
जळगाव जिल्हा परिषदेचे 2017 मधील पक्षीय बलाबल –
भाजप – 33
काँग्रेस – 04-
शिवसेना – 15
राष्ट्रवादी – 16
मोठ्या प्रमाणात पक्षांतर होण्याची शक्यता –
राज्यात आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. शिवसेनेत पक्षफुटीनंतर तसेच राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्याचे दिसून आले. यानंतर आता जळगाव जिल्ह्यात सर्वच सर्व विधानसभा जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकून आले आहेत. तसेज जिल्ह्यात दोन्ही लोकसभेच्या जागांवर भाजपचे उमेदवार जिंकून आले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महायुतीमध्ये ‘इनकमिंग’ तर महाविकास आघाडीतून ‘आऊटगोइंग’ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीतील घटक पक्षांमध्येही होणार घमासान?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका मानल्या जातात. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत म्हणून राजकीय पक्ष एकत्र असलले तरी स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात युती-आघाडी होण्याची शक्यता कमी आहे.
मागचा इतिहास जर पाहिला तर 2007, 2012 आणि 2017 च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना हे सर्वच पक्ष वेगवेगळे लढले होते. तसेच महापालिकेच्या 2008, 2013 आणि 2013 च्या निवडणुकांमध्येही हे सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यामुळे हा सर्व इतिहास पाहता यावेळी युती-आघाडी होते की नेहमीप्रमाणे सर्वच पक्ष वेगवेगळे लढतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरीतच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात घमासान होण्याची शक्यता आहे.
Kishor Appa Patil Hattrick : ऐतिहासिक विजयानंतर आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? पहिलीच मुलाखत..