ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 5 जुलै : गेल्या काही दिवसांपासून पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांच्याविरोधात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अशोक कचरु पवार यांच्याविरोधातील तक्रारी अर्जाच्या अनुषांगाने तसेच कायदा व सुव्यवस्था, प्रशासकीय तसेच जनहितार्थ त्यांची तडकाफडकी नियंत्रण कक्ष जळगाव येथे बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी आज शनिवार 5 जुलै रोजी काढले आहेत.
तर दुसरीकडे पाचोरा शहरात काल 4 जुलै रोजी दिवसाढवळ्या आकाश मोरे या तरूणाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. असे असताना पाचोरा तालुक्यातील कायदा व सुवस्थेच्या अनुषंगाने जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी मोठं पाऊल उचलत पाचोरा पोलीस स्टेशनचे पीआय अशोक पवार यांची तडकाफडकी बदली केल्याचे सांगितले जात आहे.
पीआय अशोक पवार यांची बदली –
पाचोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून अशोक पवार यांनी मार्च 2024 मध्ये पदभार हाती घेतला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्थेबाबत अशोक पवार यांच्याबाबत वरिष्ठ स्तरापर्यंत अनेक तक्रार केल्या जात होत्या. अशातच काल पाचोरा शहरात गोळीबाराची घटना घडली. यामध्ये एका तरूणाला आपला जीव गमावावा लागला. या संपुर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात, याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.
दरम्यान, जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पीआय अशोक पवार यांच्या बदलीचे आदेश काढले. अशोक पवार यांची सध्या जळगाव नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अशोक पवार यांच्या जागेवर चाळीसगाव ग्रामीणचे प्रभारी राहुलकुमार दत्तात्रय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप महादेव मुटेकर यांच्याकडे चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेनशनचा तात्पुरता प्रभारी पदभार देण्यात आला आहे.
तरूणाच्या खूनानंतर पीआयची बदली –
पाचोऱ्यात भरदिवसा आकाश मोरे या तरूणाची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. या घटनेने पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक (एसपी) डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने मोठा निर्णय घेत पाचोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची बदली केली असल्याचे सांगितले जात आहे.
एसपींच्या आदेशपत्रात नेमकं काय म्हटलंय? –
सन 2015 चा महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22 (न) चे पोटकलम (2) व त्याखालील सुधारीत स्पष्टीकरणानुसार सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान असलेल्या अधिकाराचा वापर करुन जळगाव जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने पोनि अशोक कचरु पवार, नेम. पाचोरा पोस्टे यांचे विरुध्दच्या तक्रारी अर्जाच्या अनुषांगाने त्यांची व जळगांव घटकातील खालील नमूद अधिकारी यांची, प्रशासकिय निकड तसेच विनंतीच्या कारणावरुन कायदा व सुव्यवस्थाच्या अनुषंगाने, जनहितार्थ, नवीन नेमणुक मध्यावती प्रशासकिय/विनंती बदली करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला असल्याचे पाचोरा पोलीस स्टेशनचे पीआय अशोक पवार यांची बदली करतानाच्या आदेशपत्रात एसपी डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी म्हटलंय.