जळगाव, 11 फेब्रुवारी : प्रशासनात पारदर्शकता वाढविणे तसेच नागरिकांना शासकीय सेवा सहज, सोप्या आणि परिणामकारक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या विशेष सेवाकर्मी ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हा परिषदेला राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.ॉ
विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले –
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा परिषदेने ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर, ऑनलाइन सेवा वितरण, प्रलंबित प्रकरणांची वेळेत पूर्तता, तसेच तक्रार निवारण व्यवस्थेचे सुदृढीकरण यांसारखे विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले. या उपक्रमांमुळे कामकाजात गती, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढले असून नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत राज्यस्तरावर गौरव –
राज्य शासनाने जळगाव जिल्हा परिषदेच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत राज्यस्तरावर गौरव केला आहे. ही यशस्वी कामगिरी अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयातून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे साध्य झाली असल्याची भावना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी व्यक्त केली आहे. यापुढेही नागरिकाभिमुख, तंत्रज्ञानाधारित व पारदर्शक प्रशासन देण्यासाठी जळगाव जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






