पाटणा, 28 जानेवारी : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीसोबत आघाडी मोडत राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आज सकाळीच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, यानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आणि आता पुन्हा त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करत पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
या लोकांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच त्यांच्यासोबत विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, डॉ. प्रेम कुमार, श्रवण कुमार, संतोष कुमार सुमन, सुमित कुमार सिंग यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान, त्याआधी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. याबाबत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले की, “विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्व आमदारांनी एकमताने बिहारमध्ये भाजप, जेडीयू आणि एनडीएमधील इतर मित्र पक्षांसोबत लोकांच्या कल्याणासाठी एनडीएचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. राज्यात सम्राट चौधरी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी, तर विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.