जामनेर, 7 जानेवारी : जामनेर तालुका साहित्य, सांस्कृतिक मंडळातर्फे आज 14 वे खानदेशस्तरीय मराठी साहित्य संमेलन (स्व.) पद्मश्री ना. धों. महानोर साहित्य नगरी एकलव्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर, जळगाव रोड, जामनेर येथे आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाचे असे आहे नियोजन –
या साहित्य संमेलनात कवी, गीतकार, लेखक, अभिनेता असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले नाशिक येथील अजय बिरारी अध्यक्षस्थानी राहतील तर ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डी. डी. पाटील यांनी जामनेर येथील पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार माजी नगराध्यक्षा साधना महाजन स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच ते यावेळी म्हणाले की, सकाळी दहा ते अकरा वाजता उद्घाटन समारंभ, अकरा ते बारा कथाकथन होईल. यासाठी राहुल निकम (जळगाव) हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
रमेश बनकर (पहूर) व डॉ. संगीता गावंडे (जामनेर) यांचा सहभाग या सत्रामध्ये राहणार आहे. दुपारी बारा ते साडेबारापर्यंत भोजन व्यवस्था असून दुपारी एक ते तीन या दुसऱ्या सत्रामध्ये निमंत्रित कवी संमेलन ठेवण्यात आलेले आहे. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक व साहित्यिक बी. एन. चौधरी (धरणगाव) तसेच मधु पांढरे उपस्थित राहणार आहेत.
या कवी संमेलनात खान्देश विभागीय कविवर्य उपस्थित राहणार असून आपल्या कविता सादर करणार आहेत. तिसऱ्या सत्रात बक्षीस वितरण व सत्कार सोहळा होणार आहे. विजय सूर्यवंशी, श्रीकांत पाटील, शंकर भामरे, प्रतिभा चौधरी हे संमेलनाचे सूत्रसंचालन करणार आहेत. दरम्यान, हे संमेलन सर्वांसाठी खुले आहे.
संमेलन अगदी वेळेवर सुरू होणार असून सर्व साहित्यिक, कवी व मान्यवरांनी संमेलनास वेळेवर उपस्थिती द्यावी, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष डी. डी. पाटील, उपाध्यक्ष मधुकर पांढरे, सचिव गोरख सूर्यवंशी, सहसचिव जितेंद्र गोरे, खजिनदार सुखदेव महाजन व संचालक मंडळाने केले आहे.