चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
सुरत (गुजरात), 22 एप्रिल : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू असताना गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधीच भाजपनं एक जागा जिंकली आहे. गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले.
काय आहे संपूर्ण बातमी? –
सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून निलेश कुम्भानी निवडणूक लढवत होते. दुसरीकडे अपक्ष उमेदवारांनी देखील या मतदारसंघात अर्ज दाखल केला होता. यासाठी सुरतमध्ये 7 मे रोजी मतदान होणार होते.
मात्र, काँग्रेसचे उमेदवार निलेश कुम्भानी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. तसेच सर्व अपक्ष उमेदवारांनी देखील माघार घेतली. त्यामुळे या जागेवर निवडणूक लढवणारे मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार असल्याने ते त्यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मिळाले खासदारकीचे प्रमाणपत्र –
मुकेश दलाल यांच्या विजयाची सुरतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांना खासदारकीचे पत्रही देण्यात आले आहे. अन्य सर्व उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता दलाल प्रत्यक्ष निवडणूक न लढवताच खासदार झाल्याने सुरतमध्ये भाजपकडून जल्लोष करण्यात आला.
काँग्रेस उमेदवारांचा अर्ज का बाद करण्यात आला? –
काँग्रेसचे उमेदवार निलेश कुम्भानी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या उमेदवारी अर्जाची पडताळणी करण्यात आली. दरम्यान निलेश कुम्भानी यांच्या उमेदवारी अर्जावर ज्या तीन सूचकांची नावे होती, त्यांच्या हस्ताक्षरांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. विशेष म्हणजे कुम्भानी यांच्या उमेदवारी अर्जावरील सह्या आमच्या नाहीत, असे या सूचकांनी सांगितलं होते. त्यानंतर दिनेश जोधानी यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर कुम्भानी यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवण्यात आला.
हेही वाचा : Special Interview : जळगावच्या डॉ. नेहा राजपूत UPSC मध्ये देशात 51 व्या, तरुणाईला दिला हा मोलाचा सल्ला