मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामध्ये 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्या शपथविधी सोहळ्यातही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने तो कधी होणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. अखेर उद्या रविवारी नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे.
अनेक बैठका आणि दिल्लीवारीनंतर नागपूरमध्ये रविवारी 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. परवा 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेश सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर बावनकुळे यांनी सागर बंगल्यावर येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल झाले. या दोघांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली, अशी माहिती आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला काय –
राज्यातील महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती मंत्रिपदे मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप कोणती महत्त्वाची खाते आपल्या मित्रपक्षांना देते, हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. यामध्ये आता मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युलाही अखेर ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.
या फॉर्म्युल्यानुसार, भाजपकडे 22 मंत्रिपदे असणार आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 12, अजितदादांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदे मिळणार आहेत. यामध्ये भाजपला 18 कॅबिनेट तर 4 ते 5 राज्यमंत्रीपद मिळणार आहे. तर, शिवसेनेला 9 कॅबिनेट तर 2 ते 3 राज्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादीला 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.