नवी दिल्ली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा होता. या दरम्यान, त्यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच इतर केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या होत्या. यानंतर त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती यांची भेट घेण्याची एक पद्धत आहे. त्याप्रमाणे त्यांची भेट घेतलेली आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची एक दीर्घ भेट झाली.
या भेटीत त्यांचे आशीर्वाद घेत महाराष्ट्राच्या संदर्भात चर्चा झाल्या. महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे, त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेकरता या राज्याला गतिशील ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच यासाठी ते संपूर्ण सहकार्य महाराष्ट्राला द्यायला तयार आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली –
दरम्यान, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, पक्षाचे प्रमुख नेते, यांचीही सदिच्छा भेट घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच जे. पी. नड्डा, अमित शहा, बी. एल. संतोष यांच्याशी काल रात्री मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
काल चंद्रशेखर बावन्नकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केली. प्रत्येक विभागातून मंत्रिपदाचे उमेदवार कोण असू शकतात, कोणाला मंत्री बनवू शकते, याची संभाव्य यादीही त्यांच्यासमोर तयार केली आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावर ते निर्णय घेतील आणि आम्हाला कळवतील. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युलाही ठरला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
ट्विट करत मानले पंतप्रधानांचे आभार
दरम्यान, नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी म्हटले की, आपला अमूल्य वेळ, मार्गदर्शन, आशीर्वाद आणि महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार. गेल्या 10 वर्षात तुमच्या पाठिंब्याने महाराष्ट्र जवळपास प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे आणि आता तुमच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली विकासाचा हा प्रवास पुढील स्तरावर नेण्याचे ध्येय आहे. तुम्ही आमच्या सारख्या करोडो भाजप कार्यकर्त्यांना आणखी कठोर परिश्रम करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत आहात.
अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?, शपथविधीची तारीखही सांगितली