मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि एक दु:खद बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं निधन झालं. आज पहाटे वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा –
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी झाला. शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत स्थलांतर केले. त्यांनी एमए आणि एलएलबीची पदवी घेतली होती. तसेच मुंबईत कोहिनूर नावाचे शिकवणीचे वर्ग सुरू केले होते. याशिवाय मुंबई पालिकेत अधिकारी पदावर कामही केले.
दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर दोन दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.
बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय –
मनोहर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक होते. त्यांना जोशी सर असेही म्हटले जायचे. मनोहर जोशी हे 1976-1977 काळात मुंबईचे महापौर होते. शिवसेनेकडून 1990-1991मध्ये त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली होती. त्यानंतर 1995 मध्ये ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले. शिवाजी पार्कवर भव्य शपथविधी पार पडला होता. तसेच 1999 ते 2002 केंद्रीय मंत्रिमंडळात मानव संसाधन विकास मंत्री म्हणूनही काम पाहिले. 2002 ते 2004 लोकसभेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत 8 हजार मतांनी पराभव झाला होता.
गेल्या काही काळापासून राजकारणात मनोहर जोशी फारसे सक्रिय नव्हते. त्यांच्या निधनानंतर आता राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.