चंद्रपूर, 19 फेब्रुवारी : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील रामपूर गावातील रहिवासी महाराष्ट्राचा सुपुत्र संकेत जनार्दन गव्हाळे या तरुणाची रशियातील मॉस्को येथे आयोजित केलेल्या प्रतिष्ठित “व्हिटाली चुर्किन यांच्या स्मरणार्थ तिसऱ्या परराष्ट्र धोरण बैठका या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी भारताच्या एकमेव प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. अलेक्झांडर गोर्चाकोव्ह सार्वजनिक राजनय निधी यांच्या वतीने आयोजित ही परिषद 19 ते 22 फेब्रुवारी 2025 दरम्यान पार पडणार आहे.
जागतिक परराष्ट्र धोरण परिषदेसाठी निवड –
चंद्रपूरच्या संकेत गव्हाळे या तरूणाची ही निवड अत्यंत स्पर्धात्मक प्रक्रियेतून झाली असून, विविध देशांतील मोजक्या प्रतिनिधींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. दरम्यान, या परिषदेच्या माध्यमातून संकेत यांना जागतिक परराष्ट्र धोरण तज्ज्ञ, संशोधक आणि आघाडीच्या शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. तसेच, जागतिक भू-राजकीय संकटे, माध्यमांची राजनयिक भूमिका आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या रणनीती यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर विचारमंथन होणार आहे.संपूर्ण जगभरातील अग्रगण्य संशोधक, माध्यम तज्ज्ञ आणि धोरण अभ्यासक या परिषदेत सहभागी होणार आहेत. दरम्यान, संकेत जनार्दन गव्हाळे यांच्या या निवडीमुळे महाराष्ट्र आणि भारताचा जागतिक स्तरावर सन्मान वाढला आहे. माध्यम, राजनय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या क्षेत्रांमध्ये भारताची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करणारे हे यश समर्पण, ज्ञान आणि माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञतेचे प्रतीक ठरले आहे. संकेत हे भारतीय जनसंचार संस्थेचे (IIMC) माजी विद्यार्थी आहेत.
जागतिक घडामोडींचे सखोल आकलन, माध्यमांची राजनयिकांवरील प्रभावी भूमिका आणि जागतिक संवादात त्यांचा सक्रिय सहभाग यामुळे त्यांनी या संधीसाठी आपली वेगळी छाप उमटवली. दरम्यान, आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना संकेतने प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, माझी ही निवड केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारताची जागतिक चर्चांमध्ये वाढती भूमिका अधोरेखित करणारी ही संधी असून, माध्यम आणि परराष्ट्र धोरण यांच्यातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी अशा कार्यक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत