पारोळा, 21 फेब्रुवारी : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त पारोळा येथे संघटनेच्या मुख्य कार्यालयात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 19 फेब्रुवारी 2022 रोजी च्या जयंती दिवशी महाराष्ट्र शेतकरी संघटनेची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून संघटनेच्या माध्यमाधून गाव तेथे शाखा, पिक विमा, पाटचारी, सिंचन प्रकल्प, कृषी विभाग, त्यासोबत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रश्नावर काम सुरू आहे.
प्रामुख्याने पारोळा, धरणगाव, एरंडोल, भडगाव या तालुक्यांमध्ये संघटनेने गाव ते शाखा अभियान राबवले. तसेच शाखा स्थापन करून शेतकऱ्यांना एकत्र करून न्याय देण्याचे काम करीत आहे, या व्यतिरिक्त जळगाव जिल्ह्यासोबतच धुळे, वर्धा, नाशिक, नगर, संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये संघटनेच्या विचारांना शेतकऱ्यांना जोडण्याचे काम सुरू आहे. शेतकरी जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत संघटना रात्रंदिवस काम करेल, असेही ते यावेळी म्हणाले.
आपल्या देशात कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात झालेले आहे. मात्र, शासनाने चुकीचे धोरण अवलंबून बाहेर देशातून कापसाची आयात केल्यामुळे कापसाचे भाव पडले असे म्हणण्यापेक्षा पाडण्यात आले असे म्हणावे लागेल. त्यामुळे मागील वर्षी 14 ते 15 हजार रुपये प्रति क्विंटल भाव असल्यावरही या वर्षाला फक्त आणि फक्त आठ हजारापर्यंत भाव जात आहे. उत्पादन खर्चाचा विचार केला असता कापूस परवडण्यासारखा राहिलेला नाही. शासनाने ही जुलमी पद्धत वापरून शेतकऱ्यांना आर्थिक मानसिक त्रास देण्याचे ठरवलेले दिसते, असे आरोप त्यांनी केला. तसेच या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शेतकरी संघटना 8 ते 10 दिवसाच्या आत कापूस भाव वाढीसंदर्भात अति तीव्र आंदोलन करेल, असे सांगितले.
पिक विमा संदर्भातही शासन दिशाभूल करताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर तोडकी नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना फसवण्याचे कारस्थान कंपनी आणि शासन करताना दिसत आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी शेतकरी हिताचे काम करणाऱ्यांना दिर्घ आयुष्य लाभो व शेतकरी संघटीत करून त्यांना आर्थिक, सामाजिक, सक्षम करो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाप्रसंगी पारोळ्यातील पत्रकारांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
हेही वाचा – पाचोऱ्यात छत्रपती शिवरायांना अभिवादन, वैशाली सुर्यवंशी यांनी दिला एकजुटीचा संदेश
पदाधिकाऱ्यांची निवड –
महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या धरणगाव तालुका अध्यक्षपदी संजय सिताराम चव्हाण, कार्याध्यक्षपदी प्रदीप एकनाथ चव्हाण व युवा अध्यक्षपदी सुबोध सिताराम खैरनार यांची निवड करण्यात आली. पारोळा तालुका सचिव म्हणून ईश्वर दारासिंग मोरे गोंडगाव गणप्रमुख म्हणून रोहिदास रतन माळी यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा कल्याणी देवरे, तसेच संघटनेचे प्रवक्ते सुभाष पवार, भडगावचे तालुका अध्यक्ष अभिमन हाटकर, जळगाव जिल्हा सचिव आनंदराव पाटील, पारोळा तालुका अध्यक्ष डॉ. विनोद चौधरी, प्रिया गुजर, स्वेता पाटील, स्वाती महाजन, योगिता पाटील, सपना पाटील, मोहिनी पाटील, भडगाव तालुका कार्यकारणी, पारोळा तालुका कार्यकारणी, शाखा कार्यकारिणी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. विनोद चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.