चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 1 मे : देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत मोठा विजय प्राप्त करण्यासाठी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाका सुरू आहे. दरम्यान, येथे आयोजित केलेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांवर भटकती आत्मा असे म्हणत त्यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, पंतप्रधान मोदींच्या या टीकेनंतर राज्याचे राजकारण तापले असून पंतप्रधान मोदींवर महाविकास आघाडीकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? –
पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना लक्ष्य करत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. नरेंद्र मोदींनी शरद पवार यांचे नाव घेत त्यांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला केला होता. महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला असून 45 वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने या खेळाची सुरुवात केली होती. इच्छा पूर्ती न झालेली ‘भटकती आत्मा’ इतरांचाही खेळ बिघडवते. दरम्यान, या टीकेनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
शरद पवारांचा पलटवार –
शरद पवार यांनी जुन्नरमधील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदींचे म्हणणे खरे आहे. माझा आत्मा अस्वस्थ आहे, पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी नाही. तर शेतकऱ्यांचे दुखणे बघून अस्वस्थ आहे. आज देशात महागाई वाढली आहे. लोकांना संसार करणे कठीण झाले आहे, त्यासाठी अस्वस्थ आहे. अडचणीत असणाऱ्या लोकांचे दुख: मांडणे आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, हे माझे कर्तव्य असल्याचे ते शरद पवार यांनी सांगितले. माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार असल्याचेही त्यांनी स्पष्ठ केले.
अजित पवार नेमकं काय म्हणाले? –
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘भटकती आत्मा’ या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख (अजित पवार गट) अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पुढच्या सभेत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतृप्त आत्मा नक्की कोण आहे? ते विचारणार आहे. तसेच त्यांनी नेमक्या कोणत्या उद्देशाने ते वक्तव्य केले? हे देखील विचारेन, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर –
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून जोरदार प्रत्युत्तर दिले. 2014 आणि 2019 ला मोदींना महाराष्ट्रात इतक्या वेळी यावे लागले नव्हते. नरेंद्र मोदींना उद्देश्यून ते म्हणाले की, वखवखलेला आत्मा महाराष्ट्रात फिरत आहे, किती सभा घेत आहेत. पण तुम्हाला जरा संवेदना असतील तर ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्याकडे बघा. 300-350 वर्षांपूर्वी असाच एक वखवखलेला आत्मा आला होता, महाराष्ट्र राज्यावर चालून. मात्र, औरंगजेब परत कधी गेलाच नाही, अजूनही भटकत असेल इकडे, असे ठाकरे म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले? –
खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, काही भटके-वखवखते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत. महाराष्ट्राच्या हक्काचे अधिकाराचे लचके ते तोडत आहेत. महाराष्ट्र लुटला जात आहे. महाराष्ट्राच्या जनतेला कमजोर केला जात असून नामर्द करण्याची ही योजना आहे.