चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 12 एप्रिल : देशभरासह राज्यात लोकसभा निवडणूकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. दरम्यान, खान्देशातील जळगाव, रावेर, धुळे आणि नंदुरबार या चारही मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर मग कोण-कोणविरोधात लढणार हे जाणून घेऊयात.
जळगाव लोकसभा मतदारसंघ –
जळगाव लोकसभा मतदारंसघात भाजपकडून उन्मेष पाटील यांचे तिकिट कापत भाजप नेत्या माजी विधानपरिषद आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली. या संपूर्ण घडामोडी नंतर जळगाव जिल्ह्याचे राजकारण तापले. दरम्यान, उन्मेश पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना उमेदवारी मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. जळगाव लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत ठाकरे गटाच्या वाटेला आल्याने नुकत्याच प्रवेश केलेल्या करण पवार यांना जळगावसाठी उमेदवारी मिळाली. दरम्यान, स्मिता वाघ विरूद्ध करण पवार यांच्यामध्ये खासदारकीसाठी चुरशीची लढत होणार आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघ –
मागील 10 वर्षांपासून खासदारपदी असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे या लोकसभा निवडणुकीत तिकिट कापले जाणार असे बोलले जात असतानाच त्यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. यानंतर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी झाल्याने पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. या संपूर्ण घडामोडीनंतरही रक्षा खडसे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी दावेदार मानले जाणारे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी उमेदवारी नाकारली. दरम्यान, शरद पवार गटाकडून नव्या उमेदवाराचा शोध घेतल्यानंतर उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार रक्षा खडसे विरूद्ध श्रीराम पाटील यांच्यात लढत होणार आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघ –
गेल्या 10 वर्षांपासून खासदारपदी विराजमान असलेले माजी संरक्षण राज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे यांची देखील भाजपकडून तिकिट कापले जाणार आणि त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार अशा चर्चा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगल्या होत्या. मात्र, भाजपने डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी कायम ठेवत त्यांना तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने कालच डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, शोभा बच्छाव यांच्या उमेदवारी जाहीर केल्यावरून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सरणे यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी समोर आली. मात्र, असे असले तरी काँग्रेसने डॉ.शोभा बच्छाव यांची उमेदवारी कायम राखल्यास डॉ.सुभाष भामरे विरूद्ध डॉ.शोभा बच्छाव यांच्यात जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ –
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आदिवासी समुदायाची मते मोठ्या प्रमाणात असल्याने मागील 10 वर्षांपासून डॉ. हिना गावीत ह्या भाजपच्या महिला खासदार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार हे निश्चित होते. दरम्यान, भाजपने उमदेवारांच्या दुसऱ्याच यादीत त्यांना उमेदवारी जाहीर केली. तर दुसरीकडे डॉ. हिना गावीत यांच्याविरोधात काँग्रेसने नवख्या ॲड. गोवाल पाडवी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. डॉ. हिना गावीत यांच्या खासदारकीच्या कार्यकाळापूर्वी नंदुरबार लोकसभा मतदारसंघ तब्बल 35 वर्ष काँग्रेसच्या ताब्यात होता. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत डॉ. हिना गावीत विरूद्ध ॲड. गोवाल पाडवी अशी जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : लोकसभा निवडणूक 2024 विशेष : सत्तेला आव्हान देणारा माणूस, उन्मेश पाटील!