मुंबई, 16 ऑक्टोबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. असे असताना राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असताना महायुती तसेच महाविकास आघाडी जागावाटपाबाबत बैठका पार पडत आहे. दरम्यान, आज महायुतीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची प्रमुख उपस्थितीत महायुती सरकारचे गेल्या दोन वर्षातील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आले.
महायुती सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर –
राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा काल पार पडली. यानंतर आज महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुती सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा आज पत्रकार परिषदेत मांडले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार सुनिल तटकरे, आमदार प्रविण दरेकर तसेच प्रसाद लाड, सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, रिपोर्ट कार्ड देण्यासाठी धाडस लागते. रात्रंदिवस काम करावे लागते. दोन, अडीच वर्षांत तब्बल 900 निर्णय घेतले असून आम्ही प्रचंड कामे केली. दरम्यान, तुमच्यात हिंमत असेल तर मग होऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी असे आव्हानही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले आहे. महाविकास आघाडी आमच्या सर्व योजना बंद करण्याची भाषा करत आहे. परंतु, लाडकी बहीण योजनेला हात लावला तर याद राखा, त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार असून आमच्या लाडक्या बहिणी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे, असे निशाण शिंदे यांनी विरोकांवर साधला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. खरंतर, आमच्यासाठी शंखानाद तर इतरांसाठी ऐलान झाले आहे. आज आम्ही महायुती सरकारच्यावतीने करण्यात आलेल्या कामांचा संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आज मांडत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात परिवर्तनशील योजना महाराष्ट्रात आणल्या गेल्या असून स्थगिती सरकार गेल्यावर गती आणि प्रगतीचे सरकार राज्याने पाहिले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी स्वतंत्र कंपनी तयार करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य ठरल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी महायुती सरकारच्यावतीने करण्यात आलेल्या कामांची माहिती देत विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय.
अजित पवार काय म्हणाले? –
महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महायुती सरकारच्या योजना जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद पाहून विरोधक घाबरले आहेत, असे म्हणणार नाही. पण, विरोधक योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून गडबडले आहेत. दरम्यान, गेल्या दोन वर्षांमध्ये महायुती सरकारने जनतेच्या आयुष्यात बदल घडवून आणला असून महिला, उद्योग, रोजगार अशा विविध क्षेत्रात सरकारने अविरत मेहनत घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले.