पाचोरा, 7 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या माहेजी गावाच्या यात्रेला 6 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या महासंकटामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. यानंतर यावर्षी पुन्हा या यात्रेला सुरुवात झाली आहे. यामुळे येथे येणाऱ्या भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावर्षी देवीची सेवा करण्याचा मान येथील भगत कुटुंबाकडे असल्याने एक एक वर्ष आदलून बदलून या कुटुंबातील एक सदस्य सेवा देतात. यावर्षी रविंद्र भगत यांच्याकडे हा मान आलेला आहे. तब्बल 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेला काल सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता पाटील यांनीही भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत माहेजी गावाचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि इतर नागरिक उपस्थित होते.
या यात्रेला दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तालुक्यातील अनेक नागरिक आपल्या परिवारासह या यात्रेला येत असतात. तसेच अनेक राजकीय नेतेही या यात्रेला भेट देत असतात. याठिकाणी जिल्हा भरातून भाविक कबुल केलेले नवस फेडण्यासाठी येत असतात. यात्रेमध्ये विविध प्रकारची खेळणे, पाळणे, भांड्यांची दुकाने, गृह उपयोगी वस्तू, करमणुकीची साधने येतात. यातून लाखो रुपयांची उलाढाल होते.
या यात्रेचे या वर्षाचे पूजेचे मानकरी माजी खासदार ए. टी. नाना पाटील आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी या यात्रेस सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता पाटील यांनीही माहेजी देवी मातेचे दर्शन घेतले. यावेळी अस्मिता पाटील यांनी माहेजी गावातील महिलांसोबत उत्साहाने नृत्यामध्ये भाग घेऊन आनंद साजरा केला.
अशी आहे यात्रेची आख्यायिका –
पुर्वी माहेजी गावाचे नाव चिंचखेडा असे होते. सव्वा तीनशे वर्षांपूर्वी बोरनार येथील सासर असलेल्या वेडगळ समजून गावाबाहेर काढून दिलेल्या सासरच्या जाचास कंटाळलेल्या एक महान स्त्री चिंचखेडा या गावी आली. गावातील लहान बालकांनी तीला चिडवले आणि त्रास देण्यास सुरुवात केली. यावेळी त्या स्त्रीने दैवी शक्तीने त्या मुलांना मुर्छित केले. या प्रकाराने भांबावून गावातील नागरिक त्या स्रीला शरण आले आणि यावेळी गावातील नागरिकांनी या महिलेची क्षमा मागितली आणि या मुलांना पूर्ववत करण्याची विनंती केली.
यानंतर या देवीचे मुलांना पुर्ववत करून दैवी शक्तीची प्रचिती दिली. तसेच गावात काही दिवस निवास केल्यानंतर चिंचखेडा गावात समाधी घेणार असल्याचे सांगितले. यानंतर स्वतः हुन अग्नीदहन करून घेतले. यानंतर त्याचठिकाणी शेंदूराचे बाण निघाले आणि मग गावकऱ्यांनी त्याच जागेवर मुर्तीची प्रतिष्ठापना केली. या माय देवीच्या नावावरुन चिंचखेडा गावाचे नाव मायजी (माहेरी) बनले. यानंतर याठिकाणी यात्रोत्सवाला प्रारंभ झाला.