मुंबई, 19 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे सिन्नर मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात अडचणीत आलेल्या माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, सत्र न्यायालयाने दिलेल्या दोषसिद्धीला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिल्याने कोकाटे यांच्या आमदारकीवरील संकट कायम आहे.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर –
माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यावरून त्यांनी सत्र न्यायालयाच्या दोषसिद्धीला स्थगिती देण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, आज दुपारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ही सुनावणी करताना उच्च न्यायालयाने दोन वर्षांच्या शिक्षेमुळे होणारी अटक व तुरुंगवास तात्पुरता स्थगित केला असून जामीन मंजूर केला आहे.
आमदारकी गमावण्याची शक्यता कायम –
माणिकराव कोकाटे यांच्या सदनिका घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने 2 वर्षाची अटक आणि तुरुंगात रवानगी या परिस्थितीला स्थगिती दिली आहे. मात्र, दोषसिद्धीला स्थगिती न दिल्याने लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार आमदारकी गमावण्याची शक्यता कायम आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर कोकाटे यांची अटक टळली असली तरी आमदारकी वाचवण्यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन वर्षांची शिक्षा झाल्यास आमदारकी आपोआप रद्द होते, अशी कायदेशीर तरतूद आहे.
नेमकं प्रकरण काय? –
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकांचा लाभ घेतल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाने कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्याविरोधात माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगितीची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या याचिकेवर न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठासमोर आज दुपारी सुनावणी पार पडली.






