नवी मुंबई, 27 जानेवारी : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अखेर मराठ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. काल रात्री अकराच्या सुमारास सरकारचे शिष्टमंडळ अधिकारी मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टाईसाठी आले होते. तब्बल अडीच ते तीन तास चर्चा झाली. यावेळी सरकारने दिलेला अध्यादेश मनोज जरांगे पाटील आपल्या वकिलांना आणि मराठा बांधवांना येऊन सांगत होते. होकार आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे आंदोलन इथेच स्थगित करण्यात येणार आहे. तसेच आझाद मैदानात जाणार नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लवकरच विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्व लोक मावतील असे मोठे मैदान पाहून एक तारीख जाहीर करून जल्लोष साजरा केला जाईल, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले. आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते सभा घेणार आहेत. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर, गृहनिर्माण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या समक्ष मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अध्यादेश मनोज जरांगे पाटील स्वीकारून हे उपोषण सोडणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या या मागण्या मान्य –
आतापर्यंत 57 लाख कुणबी नोदी सापडल्या आहेत. ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र द्यावं तसंच त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा प्रमाणपत्र द्यावं, हे सरकारने मान्य केलं.
सरकारने सग्यासोयऱ्यांबद्दल अध्यादेश काढला आहे. तो मनोज जरांगेंना देण्यात आला
त्यामुळे ज्यांच्याकडे कुणबीप्रमाणपत्र असेल त्यांच्या नातेवाईकांनाही कुणबी म्हणूनच मान्यता मिळाली.
जालना आणि बीडमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अनेक मराठा बांधवांवर गुन्हे दाखल होते. त्या मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहे.
वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे.
मराठवाड्यात कमी प्रमाणपत्र सापडले आहे. त्याबाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे.
जो अध्यादेश दिला आहे, त्याबद्दल विधानसभेत लवकरच कायदा करण्यात येणार आहे.