पाचोरा, 12 एप्रिल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला संपूर्ण देशात उत्साहात साजरा केली जाते. पाचोरा येथेही बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येते.
पाचोरा येथे अशी निघणार मिरवणूक –
यावर्षी ही मिरवणूक जनता वसाहत भारतीया नगर येथून निघणार आहे. तसेच शिवाजीनगर, जामनेर रोड, प्रकाश टॉकीज चौक, आठवडे बाजार, गांधी चौक, या मार्गाने ही मिरवणूक निघणार आहे. यामध्ये अनेक बालगोपाळ मंडळी, महिला वर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी उपस्थित राहतील.
यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने
व्याख्यानमाला आणि भीम गीतांचा कार्यक्रमही घेतला जातो. दरम्यान, येत्या 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता निर्माण राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पाचोरा पोलीस स्टेशनतर्फे सर्व मंडळांना बोलून त्यांचे आयोजक व अध्यक्ष कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सर्वांना योग्य सूचना व मार्गदर्शन केले. तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी कार्यकर्त्यांना शांततेत ही मिरवणूक काढण्यासाठी सूचना केल्या.
यावेळी अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, एमएसईबीचे बबलू आदिवाल, प्रवीण ब्राह्मणे, किशोर डोंगरे, अशोक मोरे, अविनाश सावळे, रोहित ब्राह्मणे इत्यादींनी काही सूचना मांडल्या. यावेळी सर्व मंडळाचे सदस्य आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.