चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 10 मे : लोकसभा निवडणूक संपत नाही तोच विधानसभा निवडणुकीचे वेध राज्यातील पक्ष नेत्यांना आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेत्यांकडून राज्यातील झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले जात असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पावले उचलली जात आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाला राज्यात 80 जागा मिळाव्यात, अशी मागणी व्यक्त केली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मंत्री अनिल पाटील यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, महायुतीमध्ये असताना किंवा नसताना जागांबाबत विचार करण्याची आवश्यकता नाही. जे निकष ठरले आहेत, त्यानुसार छगन भुजबळांनी 90 जागांची मागणी मागच्या मेळाव्यात केली असली तरी किमान 80 जागा राष्ट्रवादीने लढविल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. – शक्य त्या ठिकाणी सर्वेक्षण, निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारी किंवा जागेची घोषणा केली पाहिजे आणि त्यासाठी आतापासूनच कामाला लागले पाहिजे.
उत्तर महाराष्ट्रात 8 जागा लढण्याची अपेक्षा –
विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी अजित पवार गट 80 जागा लढविण्यासाठी इच्छुक आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 4 जागा, नंदुरबार 2 आणि धुळे 2 याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात आठ जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, लोकसभेत राज्यातील विजयात भाजप, शिवसेना यांच्याबरोबरीने राष्ट्रवादी आमच्या पक्षाचा देखील वाटा असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून होणार निर्णय –
मंत्री अनिल पाटील पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता महायुती उमेदवाराच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तालुकाध्यक्ष व सहकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले. आणि म्हणून उत्तर महाराष्ट्रात आठपैकी दोन जागा महायुतीच्या निवडून आल्या आहेत. दरम्यान, जागावाटपाबाबत महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून यावर कमी-अधिक काय असेल तो निर्णय होणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा : नरेंद्र मोदींनी स्विकारला पंतप्रधान पदाचा पदभार, पहिलीच सही शेतकऱ्यांसाठी, घेतला ‘हा’ मोठा निर्णय?