ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 1 डिसेंबर : गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. आता मधला जो अडथळा राहिलाय त्याला बाजूला करून भाजपच्या पाचोरा-भडगावमध्ये नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. पाचोरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुचेताताई दिलीप वाघ व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ पाचोऱ्यात जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, गुन्हेगारी कमी करून शहराच्या विकासाठी मला पाचोरा दत्तक घायचे असल्याचेही मंत्री महाजन म्हणाले.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या अर्थव्यवस्था प्रगती पथावर असून सर्वसमावेशक विकासाचे धोरण सध्यास्थितीत राबिवले जातेय. यामुळे आता देशाला महासत्ता बनवायचं असेल तर भाजपशिवाय पर्याय नाहीये. तसेच आता केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाची घोडदौड सुरू असल्याचेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले. दरम्यान, आता सगळेच म्हणताय की, जामनेर सारखं पाचोऱ्याचा विकास करा. मात्र, मी आज तुम्हाला शब्द देतो की, पाचोऱ्यात भाजपची सत्ता हातात द्या जामनेरपेक्षा एक पाऊल पुढे पाचोऱ्याचा विकास करून दाखवेन, असेही मंत्री महाजन म्हणाले.
पाचोऱ्यात आयोजित भाजपच्या जाहीर सभेत आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर टीका केली. तसेच पाचोरा-भडगावमध्ये भाजपची सत्ता आणावी, असेही आवाहन त्यांनी उपस्थित जनतेला केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधूकर काटे यांनी केले.
याप्रसंगी भाजपचे संजय वाघ, वैशालीताई सुर्यवंशी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुचेताताई वाघ, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार तसेच भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






