जळगाव, 5 सप्टेंबर : कुंभार जसा मातीला आकार देऊन त्यापासून वेगवेगळ्या मौल्यवान वस्तू तयार करतो, त्याचप्रमाणे शिक्षक देखील विद्यार्थ्यांना आकार देऊन त्यांच्या माध्यमातून देशाचे उद्याचे भवितव्य निर्माण करीत असतात. त्यामुळेच देशाच्या विकासात शिक्षकांचा वाटा मोठा आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा –
शहरातील गंधे सभागृहात 5 सप्टेंबर रोजी आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 2024 च्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार स्मिता वाघ, आमदार लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबई येथे असल्याने त्यांनी या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे काम या जिल्ह्यातील शिक्षक करीत आहेत. शिक्षकांच्या माध्यमातून उद्याची पिढी घडत असते शिक्षक वेगवेगळे विद्यार्थी तयार करण्याचे काम करतात. त्यातूनच अनेक मोठ्या पदावरील अधिकारी, राजकारणी, कलावंत तसेच विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक घडत असतात. कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देतो त्याप्रमाणे शिक्षक देखील विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत असतात.
मंत्री महाजन पुढे म्हणाले की, आपल्या आयुष्यात असे अनेक शिक्षक येतात की त्यांना आपण विसरू शकत नाही. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून संस्कारक्षम पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षक पार पाडत असतात. आजची तरुण पिढी कुठे भरकटते आहे काbयाचा विचार करून बाल वयाचे शिक्षक व पालक यांच्याकडून त्यांच्यावर कसे संस्कार केले जातील याचा विचार करणे देखील महत्त्वाचे आहे. जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा दिवसेंदिवस उंचावत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी देखील वेटिंग करावी लागते ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगून शिक्षकांच्या प्रयत्नामुळेच अत्यंत संस्कारक्षम पिढ्या घडू शकतात. आदर्श शिक्षक पुरस्कार वाटपात आता पूर्णपणे पारदर्शकता आलेली असून हे पुरस्कार प्राप्त करून घेण्यासाठी देखील आता गुणवत्तेची गरज आहे. असे प्रतिपादन देखील गिरीश महाजन यांनी केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित शिक्षकांची संवाद साधताना पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील म्हणाले की, शिक्षक हा समाजाचा आत्मा असून प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाचे महत्व मोठे आहे. जळगाव जिल्हा हा शैक्षणिक गुणवत्तेत कुठेही कमी राहिलेला नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा मोठ्या प्रमाणावर उंचावलेला आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे काम देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेलो नसलो तरी सर्व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे मी अभिनंदन करतो, तसेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार स्मिता वाघ यांनी मनोगतात सांगितले की, ग्रामीण भागातील पटसंख्येकडे लक्ष देणे गरजेचे असून विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. यांना आज आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. त्यांची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद याआपल्या मनोगतात म्हणाले की, सर्व आदर्श शिक्षकांचे अभिनंदन करतो. हा पुरस्कार आजपासून आपल्याला एक नवी ओळख करून देणार आहे. निपुण भारत तसेच वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे मोठे काम झाले आहे. व ते टिकवून ठेवणे आपली जबाबदारी असल्याचे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी आपले मनोगत सांगितले की, शिक्षक समाजाचे शिल्पकार आहेत. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे भविष्य घडत असते. जळगाव जिल्हा परिषद शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे काम करीत आहे. शिक्षणासोबतच बाल सुरक्षेवर देखील भर देण्यात येत असून प्रत्येक पुरस्कार प्राप्त शिक्षकाचे यश हे फक्त त्यांचे नसून विद्यार्थी व संपूर्ण यंत्रणेचे आहे असेही ते म्हणाले. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रवीण माळी, दीपक चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
या शिक्षकांचा झाला सन्मान –
ज्ञानेश्वर भाईदास कुवर, जि प प्राथमीक शाळा जळोद, जितेंद्र प्रल्हाद पाटील, जि प प्राथमीक शाळा भडगाव, अजय रमेश वाघोदे, जि प प्राथमीक शाळा हरणखेडा, संदीप कडू पाटील, जि प प्राथमीक शाळा निंबोरा, संजय धुडकू मोरे दीप प्राथमिक शाळा उपखेड, प्रवीण शांताराम माळी जि प प्राथमीक शाळा अजातिशीम, दिलीप जुलाल कुंभार जि प प्राथमीक शाळा भोणे, हरचंद राघो महाजन जि प प्राथमीक शाळा सावदे, किरण मुरलीधर सपकाळे जि प प्राथमीक शाळा सावखेडा, संदीप मधुकर सोनार जि प प्राथमीक शाळा टाकळी, सुनील रामदास आढागळे जि प प्राथमीक शाळा मुक्ताईनगर, पुष्पालाचा आनंदराव पाटील जि प प्राथमीक शाळा कृष्णराव नगर, संजय संतोष पाटील जि प प्राथमीक शाळा सर्वे, जितेंद्र दिगंबर पाटील जि प प्राथमीक शाळा मोरगाव, दीपक वसंतराव चव्हाण जि प प्राथमीक शाळा शिरसाळा या शिक्षकांना यावेळी सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
हेही वाचा : एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या दिव्यांग प्रवाशांसाठी मोठी बातमी, महामंडळाने घेतला ‘हा’ निर्णय