जळगाव, 2 ऑक्टोबर : मेहरूण तलावात आता कायमस्वरूपी जलपर्यटन होणार आहे. यासाठी जळगाव शहरातील मेहरूण तलावात जल क्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी 15 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा आज राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केलीय. जळगावातील अॅक्वाफेस्ट जल पर्यटनमहोत्सवाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी ते बोलत होते.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
पर्यटन हा आता उद्योगाचे रूप घेत आहे. राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठे प्रकल्प राज्यात सुरु आहेत. राज्यात किल्ले, जल स्रोत, लेण्या, वन मुबलक प्रमाणात आहेत. यासाठीच देशातील सर्व राज्याचा अभ्यास करून राज्यात नवे पर्यटन धोरण आणले आहे. याचाच भाग म्हणून जळगाव शहरातील मेहरूण तलावात जल क्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी 15 कोटी रुपये देणार असून त्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबीला लगेच सुरुवात करावी, अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
राज्यातील पर्यटन विकासासाठी पर्यटन धोरण –
आपल्या राज्याला 750 किलोमीटर एवढी मोठी समुद्र किनारपट्टी आहे. इथल्या पर्यटनात मोठी क्षमता असून जगभराचे पर्यटक याठिकाणी आकर्षित होतील. यासाठी सिंधुदुर्गच्या जवळ स्कुबा डायव्हिंगचा प्रकल्प सुरु केला आहे. समुद्राच्या आत मध्ये जाऊन तिथलं जैविक वैभव ज्यात सर्व प्रकारचे जलचर प्राणी, मासे, वनस्पती पाहायला मिळतील. आज पर्यंत इथे परदेशी पर्यटकांना राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेल नव्हते ते आता हॉटेल ताजच्या रूपात पहिल्या हॉटेलच्या पायाभरणीचा शुभारंभ होणार असल्याचेही पर्यटन मंत्री यांनी सांगितले. तसेच राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात नसेल अशी डेक्कन ओडिसा सुरु करणार असून यात 24 तास राहण्यासाठीच्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यांची होती उपस्थिती –
यावेळी खासदार स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. संजय सावकारे,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, एम. टी. डी.सी. चे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण,यांच्यासह अनेक अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन महोत्सव जळगावातील मेहरूण तलावात उद्यापासून सुरू होणार, काय आहेत वैशिष्ट्ये?