यावल, 22 ऑक्टोबर : देशात दीपावली उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. या दीपावलीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावल तालुक्यातील आसाराबारी येथील आदिवासी वस्तीवर आदिवासी बांधवांसमवेत दीपावली साजरी केली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आदिवासी बांधवांना फराळाचे वाटप करत दीपवलीचा उत्सव साजरा केला.
आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी –
दीपवलीच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने दिवाळीचा आनंद साजरा करत स्थानिक आदिवासी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. निसर्गाच्या कुशीत, आपल्या आदिवासी बांधवांबरोबर साजरी केलेली ही दीपावली एक अनोखा आणि हृदयस्पर्शी अनुभव ठरला असल्याच्या भावना मंत्री महाजन यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी रावेर-यावलचे आमदार अमोल जावळे, नंदु महाजन, साधनाताई महाजन, केतकी पाटील तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री महाजनांनी आदिवासींच्या अडचणी घेतल्या समजून –
मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की, दरवर्षी मी आदिवासी पाड्यांवर सहकुटुंब दिवाळी साजरी करत असतो आणि याप्रमाणे आसाराबारी हे 100 वस्तींचे असलेलं गावात आम्ही याठिकाणी आदिवासी बांधवांसोबत यंदाची दिवाळी साजरी केली. आसाराबारी हे डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले गाव असून याठिकाणी राहत असलेल्या आदिवासी बांधवांची अवस्था अतिशय बिकट असून त्यांना राहायला स्वतःचे हक्काचे देखील घर नाहीये.
मंत्री महाजन यांनी दोन गावे घेतली दत्तक –
जमिनी वनविभागाच्या मालकीच्या असल्याने त्यांना घरकूलचा लाभ मिळत नाहीये. महसूल दर्जा याठिकाणी नसल्याने त्यांना रहिवासी तसेच जातीचा दाखल आदिवासी बांधवांना मिळत नाहीये. दीपावलीनिमित्त याठिकाणी आल्यानंतर आदिवासी बांधवांच्या अडचणी समजून घेतल्या. याठिकाणीचे दोन्ही गावे मी दत्तक घेतले असून येत्या सहा महिन्यांच्या आत जातीचे दाखले, महसूल दर्जा तसेच घरकूल, पाणीपुरवठा, वीजेची सोय करून त्यांना सामन्यापद्धतीने जीवन जगता येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.






