मुंबई, 7 ऑगस्ट : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील 151 पर्यटक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे तातडीने उत्तराखंडकडे रवाना झाले असून, आज सायंकाळी साडेचार वाजता ते देहरादून येथे दाखल होत आहेत.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष (SEOC), महाराष्ट्र यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अडकलेल्या 151 पैकी 120 पर्यटकांशी संपर्क झालेला असून ते सुरक्षित स्थळी आहेत. उर्वरित 31 पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र हे उत्तराखंड राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हा नियंत्रण कक्ष (DEOC उत्तरकाशी) तसेच राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र (NERC), नवी दिल्ली यांच्याशी सतत समन्वय साधून आहे.
महाराष्ट्राचे मुख्य सचिव,यांनी आज अपर मुख्य सचिव (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग) यांच्यासमवेत मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्र येथे परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी आनंद बर्धन, मुख्य सचिव, उत्तराखंड यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून महाराष्ट्रातील अडकलेल्या नागरिकांना आवश्यक ती तातडीची मदत करण्याबाबत विनंती केली. संचालक (आपत्ती व्यवस्थापन), उत्तराखंड यांच्याकडून महाराष्ट्र सरकारला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार बचाव कार्यासाठी खालील उपाययोजना करण्यात येत आहेत.
धाराली परिसरातील सर्व पर्यटकांना हेलिकॉप्टरद्वारे हर्षल हेलीपॅड येथून गंगोत्री येथे स्थलांतरित केले जाणार आहे. गंगोत्री ते धराली मार्गावर बस/अवजड वाहनांची व्यवस्था आणि धराली ते हर्षील दरम्यान पायी प्रवासाचे नियोजन आहे. गंगोत्री ते हर्षील दरम्यान यात्रेकरुंच्या सुरक्षिततेसाठी 10 आयटीबीपी (ITBP) पथकांची तैनाती करण्यात आली असून प्रत्येक पथक 30 पर्यटकांना संरक्षण देणार आहे. लष्कर, NDRF, SDRF आणि स्थानिक बचाव पथके सध्या धराली परिसरात कार्यरत आहेत. संपर्क यंत्रणा आणि रस्ते अद्याप पूर्ववत झाले नसून, त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
NERC च्या माहितीनुसार हवाई बचाव कार्य सुरू झाले असून लष्कराच्या छोट्या सॉर्टींमार्फत स्थलांतर सुरू आहे. बचाव कार्यासाठी उत्तराखंडमध्ये उपग्रह फोन (Satellite Phone) तैनात करण्यात आले असून श्री. राजीव स्वरूप, IGP हे जबाबदार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
पर्यटकांचे शेवटचे स्थान समजण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांना सूचित करण्यात आले असून त्यांच्या मदतीने शोधकार्य सुलभ होईल. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र हे आवश्यक समन्वय साधून बचाव, मदत आणि कुटुंबीयांना माहिती पुरविण्याचे कार्य सातत्याने करीत आहे.
संपर्क यंत्रणा:
- 1. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र
संपर्क: 93215 87143 / 022-22027990 / 022-22794229
- 2. डॉ. भालचंद्र चव्हाण,
संचालक, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, महाराष्ट्र
मोबाईल: 9404695356
- 3. उत्तराखंड राज्य आपत्कालीन कार्य केंद्र
संपर्क: 0135-2710334 / 8218867005
- 4. श्री. प्रशांत आर्य,
जिल्हाधिकारी, उत्तरकाशी
मोबाईल: 9412077500 / 8477953500
- 5. मेहेरबान सिंग,
समन्वय अधिकारी
मोबाईल: 9412925666
- 6. श्रीमती मुक्ता मिश्रा,
सहायक जिल्हाधिकारी, उत्तरकाशी
मोबाईल: 7579474740
- 7. जय पनवार,
आपत्ती व्यवस्थापन कक्ष, उत्तराखंड
मोबाईल: 9456326641
- 8. सचिन कुरवे,
समन्वय अधिकारी
मोबाईल: 8445632319