पाचोरा, 9 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील लोहारी याठिकाणी अखिल भारतीय बडगुजर समाज महाअधिवेशनाच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ठाकरे सरकार पाडणं सोपं नव्हतं. परंतु एकनाथ शिंदे निघाले. पुढे गेलेत. बघता बघता सर्व सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी जमलं, असे ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन –
यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, गुलाबभाऊंनी सांगितलं की, आम्हाला नंतर कळालं, कसे मुख्यमंत्री झाले. हे खरंय. आम्हालाही विश्वास बसत नव्हता. ऑपरेशनला तर सुरुवात केली होती. पण आमचाही विश्वास बसत नव्हता. परंतु एकनाथरावजी निघाले. पुढे गेलेत. बघता बघता सर्व सैन्य त्यांच्या मागे गेलं आणि शेवटी जमलं. झालं एकदाचं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जमून आल्या. घडून आल्या. यामागे चामुंडा मातेचाही आशिर्वाद आमच्या पाठीशी होता, असं मी सांगेन, असंही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, हे एवढं सोप्पं नव्हतं. अनेक लोकांचे आशिर्वाद शिंदे साहेबांच्या पाठिशी होते. शिवसेनेसारखा पक्षातून 40 लोकं बाहेर पडताएत, उद्धवजींना कंटाळून, त्या सरकारला कंटाळून बाहेर पडताएत. सोप्प नव्हतं. परंतु लोकं आलेत. शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहिलेत आणि म्हणून अनेक लोकांचे आशिर्वाद, दुवा त्यांच्या पाठीशी आहेत. 50 पर्यंत आपण मजल गाठायची, हे सोप्प नव्हतं. कारण, पुढारी कसे असतात तुम्हाला माहितीये, असे ते म्हणाल्यावर एकच हशा पिकला.
हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे पाचोऱ्यातील लोहारी येथे म्हणाले, “सुरुवातीला मी आणि देवेंद्रजीच मंत्रिमंडळात पण…”
मुख्यमंत्री शिंदे जाणता राजा –
आपण बघताए मागील सहा सात महिन्यात राज्यात कशाप्रकारे काम चालू आहे. आम्ही त्यांना सांगतो, साहेब झोप घ्या. पण ते रात्री तीन-तीन, चार-चार वाजेपर्यंत काम करत आहेत. लोकांना भेटताएत. पूर्वीचा काळ आठवा, जे मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरीसुद्धा चढले नाहीत, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. आमचे मुख्यमंत्री पाहा, आमचे उपमुख्यमंत्री पाहा. आज राज्याला वाटतंय खऱ्या अर्थाने खरा राजा आमचा हा जाणता राजा आहे, असे स्तुतीसुमनेही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उधळली.
दरम्यान, या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील आणि इतर राजकीय नेते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.